खरीवली गावाच्या मुख्य रस्त्याचा प्रश्न सुटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खरीवली गावाच्या मुख्य रस्त्याचा प्रश्न सुटला
खरीवली गावाच्या मुख्य रस्त्याचा प्रश्न सुटला

खरीवली गावाच्या मुख्य रस्त्याचा प्रश्न सुटला

sakal_logo
By

खर्डी, ता. १८ ः शहापूरजवळ असलेल्या सरळांबे ग्रामपंचायती अंतर्गत खरीवली गावात प्रवेश करायला गेल्या ७५ वर्षांपासून मुख्य रस्ताच नव्हता. मुख्य रस्ता खासगी जमिनीतून जात असल्याने जमीनमालकाच्या विरोधामुळे हा रस्ता रखडून पडला होता. अखेर शहापूर तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांच्या आदेशाने रस्त्याची जागा मोकळी करण्याचे आदेश दिल्याने गावकऱ्यांनी श्रमदानातून रस्त्याचे काम सुरू केले.
गावच्या विकासाच्या दृष्टीने गावातील प्रवेश करण्यासाठी असलेला रस्ता कधीही महत्त्वाचा असतो. खरीवली गावातील मुख्य रस्ताच जमीनमालकाच्या अडवणुकीमुळे रखडला होता. याबाबत शहापूर तहसीलदार यांच्या कार्यालयात ग्रामस्थांनी दावा सादर केल्यानंतर या रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गावात जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्याने खराब रस्त्यातून रुग्णांना दवाखान्यात घेऊन जावे लागत होते. चार दिवसांपूर्वी एका आदिवासी महिलेला प्रसूतीसाठी घेऊन जात असताना रस्त्यातील खड्ड्यामध्ये रिक्षा आदळल्याने बाळाच्या आणि आईच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. प्रसूतीनंतर हे बाळ मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल केले असून ते अत्यवस्थ आहे. त्यामुळे हा रस्ता किती जणांचे बळी गेल्यावर होईल, असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला होता. याबाबत तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी कागदपत्रांची पाहणी करून व स्थानिक ग्रामस्थांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन रस्ता बनविण्याचे आदेश दिल्यावर संबंधित गावकऱ्यांनी तत्काळ श्रमदानातून कच्चा रस्ता बनवायचे काम हाती घेतले आहे.

एका ग्रामपंचायत सदस्याच्या शेतातून रस्ता जातो; परंतु हा रस्ता बनवू देत नसल्याची तक्रार आल्यानंतर तहसील कार्यालयामार्फत गावातील सर्वपक्षीय नेते व संबंधित शेतकऱ्यांची बैठक घेऊन समन्वयाने प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला; परंतु मार्ग न निघाल्याने कायदेशीररित्या आदेश देऊन गावासाठी रस्ता मोकळा करून देण्यात आला.
- नीलिमा सूर्यवंशी, तहसीलदार, शहापूर.

या रस्त्यासाठी मी गेली अनेक वर्षे भांडत असून अंगावर केसेसही करून घेतल्या आहेत. शेवटी शहापूर तहसीलदारांनी आम्हाला न्याय दिला. रस्ता श्रमदानातून पूर्ण करीत आहोत. या लढ्याचे खरे शिलेदार ग्रामस्थ असून गावाच्या विकासाला नक्कीच चालना मिळेल.
- शशांक हरड, सामाजिक कार्यकर्ते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82215 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top