
नखशिखांत सौंदर्य
वैभवी शिंदे, नेरूळ
सुंदर, सालस महिला दिसली की नखशिखांत सौंदर्यवती असा उल्लेख आवर्जून केला जातो. मात्र हल्ली याचा शब्दशः अर्थ घेत नखांचे सौंदर्य खुलवण्याकडे तरुणींचा विशेष कल वाढला आहे. यात कृत्रीम नखे लावण्यापासून नखांना आकार देणे, पॉलिश करणे, आकर्षक, रंगीबेरंगी नेलपेंट लावण्याला प्राधान्य दिले जाते. लग्नसराईतील पॅकेजमध्येही हल्ली ‘नेल आर्ट’चा आवर्जून सहभाग केला जातो. याशिवाय वेगवेगळे डेज, सण-उत्सव, महाविद्यालयीन कार्यक्रमांत तरुणींकडून नेलआर्टला विशेष पसंती दिली जात असल्याचे दिसते. यासाठी अवघ्या २०० रुपयांपासून दीड- दोन हजारांपर्यंत खर्चही केला जातो.
हल्ली मॉलमध्ये नेल आर्टिस्ट म्हणून महिलांसह पुरुष कलाकारही दिसू लागले आहेत. तर काही ठिकाणी नेल आर्टसाठी खास मशीन असते, ज्यात जवळपास २५०० नेल डिझाईन असतात. आवडती डिझाईन निवडायची आणि नखांचे सौंदर्य खुलवायचे, तर काही जण आवडत्या व्यक्तीचा फोटोही स्कॅन करून नखांवर लावतात.
पूर्वी केवळ लाल, गुलाबी, मरून रंगाचे नेलपॉलिश लावले जायचे, मात्र आता हिरवे, पिवळे, काळे, राखाडी कोणत्याही रंगाचे नेलपॉलिश लावून त्यावर विविध डिझाईन्स काढण्याची क्रेझ वाढली आहे. नेलआर्टमध्ये पहिल्यांदा नखांना आकार दिला जातो. त्यानंतर नेलपॉलिश लावून सुबक नक्षीकाम केले जाते. आता नेलपॉलिशवर विविधरंगी आकर्षक कुंदन लावले जातात. तर काही वेळा खड्यांचे डिझाईन करून त्यावर घुंगरू लावले जातात. चेहऱ्याच्या सौंदर्याइतकेच आता नखांचे सौंदर्य खुलवण्याकडे तरुणींचा कल वाढत आहे.
रेनबो राइन्स्टोन नेल आर्ट
चमचम करणारे नेलपॉलिश लावून त्यावर डिझाईन केले जातात. या नेल आर्टमध्ये राइन्स्टोन्सला रेनबोच्या आकारात लावले जाते. नखांना रंगीत बनवण्यासाठी रंगबेरंगी राइन्स्टोनचा वापर केला जातो.
लेडी बग नेल आर्ट
एक ग्लॅमरस नेल आर्ट म्हणून याला पसंती दिली जाते. कोणत्याही रंगाचे नेलपॉलिश लावून त्यावर काळ्या रंगाची रेष अथवा डिझाईन केले जाते. नखांवर काळ्या रंगाचे छोटे-छोटे ठिपके काढूनही हे आर्ट साकारता येते.
स्प्रिंग फ्लॉवर नेल आर्ट
फुलांची डिझाइन नखावर काढले जाते. मात्र नखे आकर्षक दिसण्यासाठी त्यात विविधरंग भरले जातात. तर काही जण नेल स्टिकर्स लावूनही आपली हौस भागवतात.
फ्रेंच टिप नेल आर्ट
काढण्यासाठी सोपे असणाऱ्या या प्रकारात पारदर्शक नेल पॉलिशचा वापर केला जातो. त्यावर खडे अथवा बारीक डिझाईन काढले जाते.
डायमंड शेप नेल आर्ट
या डिझाइनमध्ये सिल्वर ग्लिटर आणि मोठे, गोल आकाराचे खडे लावले जातात. हे खडे नखांच्या मधोमध लावले जातात. तर बाजूला मोकळ्या जागेत छोट्या-छोट्या मोत्यांची डिझाईन केली जाते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82219 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..