
पर्यटकांची दिवेआगरला पसंती
रवींद्र पेरवे, श्रीवर्धन
मे महिन्याची उन्हाळी सुटी सुरू होताच अनेक घरांत पर्यटनाचे बेत आखले जातात. परंतु, दोन वर्षांपासून पर्यटनाची हौस भागवण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळेच यावर्षी मे महिन्यात अनेकांनी पर्यटनासाठी कोकणाला पहिली पसंती दिली आहे. वीकेंडला श्रीवर्धन तालुक्यातील बहुतेक रिसॉर्ट फुल्ल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. वाढत्या उकाड्यामुळे समुद्रकिनारी असलेली वाळू तापत असली तरी त्याचे चटके घेत पर्यटक सुटीची मजा लुटत आहेत.
समुद्राची ओढ सगळ्यांनाच असते. उसळणाऱ्या लाटा, फेसाळलेले निळेशार पाणी, किनाऱ्यावरील सोनेरी वाळू, समुद्रातील साहसी खेळ, बोटिंग यामुळे कोकणात अगदी फॉरेन टूरची अनुभूती होते. यातच कोकणातील वळणदार रस्ते, उंच डोंगर आणि घनदाट झाडी यामुळे येथील स्थळे नेहमी हवेहवेसे वाटते. धार्मिक पर्यटन करणाऱ्यांसाठी श्रीवर्धनमधील सोमजाई मंदिर, पेशवे मंदिर, दक्षिण काशी हरिहरेश्वर, तसेच दिवेआगर श्री सुवर्णगणेश मंदिर आणि मुरूड जंजिरा किल्ला असे अनेक पर्याय आहेत. समुद्र किनाऱ्यावर मौजमजा करणाऱ्या पर्यटकांसाठी श्रीवर्धन, दिवेआगर, वेळास आदगाव, कोंडविल असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. दिवेआगर येथील एक दिवसाची सहलही पर्यटकांना थंडाव्याचा अनुभव देते. याशिवाय सर्वच गावांमधील मंदिरे, जुनी घरे, छोट्या वाड्या हे सारेच पाहण्यासारखे असते.
-------------------------------------------
वाहतूक कोंडीतून सुटका
बहुतेक पर्यटकांना शिस्ते फाट्यावरून दिवेआगर येथे कमी अंतरात पोहोचता येत असल्याने या मार्गाचा वापर केला जातो. शिस्ते-दिवेआगर आणि दिवेआगरमधील अंतर्गत रस्ते हे अत्यंत अरुंद असल्याने तासन् तास वाहतूक कोंडी होते. विशेषतः शनिवार व रविवारी मोठी वाहतूक कोंडी होते. दिघी सागरी पोलिस ठाण्याचे मेजर प्रकाश सुर्वे यांनी शनिवारी (ता. १४) कडक उन्हात पुढाकार घेत दुपारची वाहतूक सुरळीत केली. मात्र, ग्रामपंचायतीने रस्ता रुंदीकरणाबाबतीत तोडगा काढला पाहिजे, अशी मागणी पर्यटक करत आहेत.
-------------------------------------------
आम्ही वर्षातून दोन ते तीन वेळा श्रीवर्धनला येतो. या ठिकाणी आल्यावर फार आल्हाददायक वाटते. येथील समुद्र किनारेही खूप स्वच्छ असतात.
- मोहन जाधव, पर्यटक, पुणे
श्रीवर्धन : दिवेआगरकडे जाताना अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी होते.
श्रीवर्धन : दिवेआगर येथील समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82220 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..