आरटीओ इमारतीची प्रतीक्षा संपणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरटीओ इमारतीची प्रतीक्षा संपणार!
आरटीओ इमारतीची प्रतीक्षा संपणार!

आरटीओ इमारतीची प्रतीक्षा संपणार!

sakal_logo
By

तुर्भे, ता. १५ (बातमीदार) : एक दशकाहून अधिक काळापासून रखडलेल्या नवी मुंबई प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नेरूळ येथे उभारणी करण्यात येणाऱ्या कार्यालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असून नागरिकांना सोयीस्कर व उत्तमरीत्या सुविधायुक्त कार्यालय लवकरच लोकार्पण होणार आहे. यामुळे जुलैमध्ये नवीन कार्यालय मिळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

परिवहन विभागाच्या ठाणे परिवहन कार्यालयावर मोठ्या प्रमाणात कामाचा बोजा पडतो. म्हणून २००४ मध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दाणा मार्केटमधील एका इमारतीमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू केले; परंतु ही जागा कोंदट, कमी असल्याने कर्मचाऱ्यांबरोबरच कामानिमित्त येत असलेल्या नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत होता. त्यामुळे सरकारला चांगले महसूल उत्पन्न देणाऱ्या परिवहन विभागाला आपले कार्यालय सुसज्ज असावे, म्हणून २०१२ मध्ये सिडकोकडून नेरूळ, सेक्टर १९ येथे भूखंड मिळवला. त्यानंतर इमारतीच्या बांधणीसाठी कार्यवाही सुरू करण्यात आली.

२०१९ मध्ये इमारतीच्या कामास सुरुवात झाली; परंतु मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या संसर्गाने इमारतीच्या कामास बाधा निर्माण झाली. त्यामुळे सलग दोन वर्षे काम रखडले. शेवटी आता २०२२ उजाडल्यावर इमारतीचे कामास जोरदार सुरुवात झाली आहे. आता या इमारतीचे काम पूर्णत्वास गेले असून अंतर्गत कामास सुरुवात झाली असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

आराखड्यामुळे काम रखडले
बांधकाम विभागाच्या तत्कालीन अभियंत्यांनी इमारतीची बांधणी कशी असावी, याची आकृती काढली; परंतु दुर्दैवाने आकृती निर्माण करताना नियोजित भूखंडावरून उच्च दाबाच्या वाहिन्या गेल्या आहेत, हे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे इमारतीच्या पायाभरणीच्या मुहूर्तावर आलेले काम रखडले होते. त्यानंतर कामास काही गती मिळाली नाही.

२०१९ मध्ये प्रक्रियेला वेग
२०१४-१५ मध्ये वाशी उपप्रादेशिक कार्यालयाचे तत्कालीन सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर मोडक यांनी पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधत आटोकाट प्रयत्न केले; परंतु पुन्हा काम रखडले. अखेर २०१९ मध्ये प्रक्रिया उरकून इमारतीच्या बांधकामास सुरुवात झाली.

जूनपर्यंत कार्यालयाचे काम संपेल, असे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सांगण्यात आले आहे.
- हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई

आरटीओ कार्यालयातील जवळजवळ काम संपुष्टात आले आहे. फक्त वीस टक्क्यांच्या आसपास काम बाकी आहे. हे काम जून महिन्यापर्यंत संपेल.
- रोहित अधिकारी, अभियंता

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82222 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top