फ्लेमिंगोंचे आगमन आनंददायी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फ्लेमिंगोंचे आगमन आनंददायी...
फ्लेमिंगोंचे आगमन आनंददायी...

फ्लेमिंगोंचे आगमन आनंददायी...

sakal_logo
By

किरण कारंडे, मुंबई

मुंबईत दरवर्षी फ्लेमिंगोंचा मुक्कामी येण्याचा कालावधी म्हणजे डिसेंबरपासून ते उकाड्याच्या एप्रिल-मे महिन्यापर्यंतचा. यंदाही फ्लेमिंगोंचा मुक्काम मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) खाडी आणि पाणथळाच्या परिसरात आहे. पण यंदाचे वर्ष हे फ्लेमिंगोंच्या आगमनाच्या निमित्ताने विशेष आहे. कारण यंदाच्या वर्षी फ्लेमिंगो मोठ्या संख्येने एमएमआर क्षेत्रात दाखल झाले. या निमित्ताने फ्लेमिंगोंचे अंतरंग जाणून घेणे गरजेचे आहे.

फ्लेमिंगोच्या प्रजाती
-जगभरात फ्लेमिंगोच्या एकूण सहा प्रजाती आहेत.
-भारतात दोन प्रजाती आढळतात.
-ग्रेटर फ्लेमिंगो आणि लेसर फ्लेमिंगो

ग्रेटर फ्लेमिंगो
ग्रेटर फ्लेमिंगो म्हणजे उंच आणि हलक्या गुलाबी रंगाच्या, तसेच काळ्या रंगाच्या टोकदार अशा चोचीचा रंग असलेला पक्षी; तर डोळ्याचा रंग पिवळा आणि शरीराचा रंग गुलाबी आणि पांढरा असलेला पक्षी. या पक्ष्याची मान ही इंग्रजीतील `एस` आकाराची असते.

लेसर फ्लेमिंगो
लेसर फ्लेमिंगो म्हणजे छोट्या आकाराचा पक्षी. जास्त गडद गुलाबी रंग आणि लाल डोळे हे या पक्ष्याचे वैशिष्ट्य; तर मानेचा आकार हा `जे` असा असतो. मुंबईत दाखल होणारे फ्लेमिंगो हे लेसर फ्लेमिंगो असतात.

खाद्य अन् गुलाबी रंग
१) गेल्या दोन वर्षांत मुंबई एमएमआर क्षेत्रात ग्रेटर फ्लेमिंगो हे तुलनेत कमी संख्येने दाखल झाले. त्यामध्ये फ्लेमिंगोचे सर्वेक्षण करण्यात आलेल्या अडचणी हे देखील अन्य कारण आहे.
२) मार्च ते मे या कालावधीत फ्लेमिंगो मोठ्या संख्येने येतात. मुंबईच्या खाडी आणि पाणथळाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात असणारे पाणी आणि खाद्य हीच मुख्य कारणे ही फ्लेमिंगोच्या एमएमआर क्षेत्रातील स्थलांतरासाठीची आहेत.
३) खाडी परिसरात आढळणारी `अल्गे` ही वनस्पती तसेच क्रस्टेशियन या कडक कवचाच्या जलचर प्राण्याचे खाद्य फ्लेमिंगोला एमएमआर क्षेत्रात मिळते. हे खाद्य त्यांच्या गुलाबी रंगासाठी पोषक ठरत असल्यानेच एमएमआर क्षेत्रात फ्लेमिंगो मोठ्या संख्येने स्थलांतर करतात.

दहा वर्षांच्या सर्वेक्षणाचा प्रकल्प
१) बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी (बीएनएचएस) ने २०१७ पासून मुंबईतील स्थलांतरित पक्ष्यांचे सर्वेक्षण करण्याची सुरुवात केली आहे. येत्या २०२७ पर्यंत एक दशकाच्या कालावधीचे हे सर्वेक्षण आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत स्थलांतरित पक्ष्यांची संख्या मोजणे आणि मॅपिंग करणे, हे मुख्य उद्दिष्ट आहे.
२) मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाचा फ्लेमिंगो पक्ष्यांच्या स्थलांतरावर, तसेच ठाणे खाडी परिसर, शिवडी आणि न्हावा या ठिकाणच्या परिसरावर काय परिणाम होतो, याचे कारण शोधणे प्रकल्पाचा उद्देश आहे. तसेच कोणत्या उपाययोजना करता येतील हेदेखील पाहण्यात येणार आहे.
३) शोध प्रकल्पाला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने निधी उपलब्ध करून दिला आहे; तर मॅन्ग्रोव्ह फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रकल्पाचे निरीक्षण करण्यात येत आहे. बीएनएचएसने नुकताच एक अहवाल मॅन्ग्रोव्ह फाऊंडेशनला दाखल केला आहे.

फ्लेमिंगोचे स्थलांतर
फ्लेमिंगोंच्या मुंबईतील आगमनाला दरवर्षी नोव्हेंबरमध्ये सुरुवात होते. ज्या ठिकाणी फ्लेमिंगोसाठी अन्न पुरेशा प्रमाणात उपलब्ध होते, अशा ठिकाणी फ्लेमिंगो साधारण तीन ते चार महिने मुक्कामी येतात. गुजरात तसेच इराण येथून फ्लेमिंगोंचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होते. साधारण मन्सूनचा कालावधी संपला की पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी हे फ्लेमिंगो मुक्कामी येतात. ज्याठिकाणी पाण्याचा स्रोत संपुष्टात यायला सुरुवात होते, अशा ठिकाणाहून फ्लेमिंगो स्थलांतर करायला सुरुवात करतात. गेल्या काही वर्षांत पाण्याची चांगली उपलब्धता, उशिरा सुरू झालेला हिवाळा यांसारख्या कारणामुळे फ्लेमिंगोंच्या आगमनात काही वेळा उशीर झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

रेकॉर्ड ब्रेकिंग संख्या
२०१८ नंतर पहिल्यांदाच फ्लेमिंगो निरीक्षणाचा उपक्रम यंदाच्या मार्च एप्रिल महिन्यात राबविण्यात आला. २०१८ नंतर टाळेबंदीमुळे या पक्षी निरीक्षणाच्या कार्यक्रमावर मर्यादा आल्या होत्या. यंदाच्या वर्षी एक लाख ३३ हजार फ्लेमिंगो एमएमआर क्षेत्रामध्ये स्थलांतर करून आल्याचे आढळले. त्यामध्ये ठाणे क्रिक फ्लेमिंगो सॅंच्युरी, शिवडी, न्हावा परिसरात हे फ्लेमिंगो आढळले आहेत. याआधी फेब्रुवारी २०२०-२१ मध्ये एक लाख ३ हजार फ्लेमिंगो आढळले होते; तर मार्च २०१९-२० मध्ये एक लाख २० हजार फ्लेमिंगो आढळले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82228 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top