जैवविविधतून समृद्धी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जैवविविधतून समृद्धी
जैवविविधतून समृद्धी

जैवविविधतून समृद्धी

sakal_logo
By

जैवविविधतेतून समृद्धी

सफारी, संशोधन केंद्रांमुळे जनजागृतीमध्ये वाढ
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई, ता. १४ : पोषक वातावरण, कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन आणि सरकारकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या जनजागृतीमुळे नवी मुंबईच्या खाडीकिनारी जैवविविधतेची समृद्धीकडे वाटचाल सुरू झाली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अगदी उरणपासून ते ऐरोली खाडीपर्यंत शहराला विस्‍तीर्ण खाडीकिनारा लाभला असून आता फ्लेमिंगो, सिगल्‍ससह लांडगे, कोल्हे अशी जंगली श्वापदे दिसू लागली आहेत.
कांदळवनांचे जंगल संपूर्ण ठाणे जिल्ह्यात विखुरले असून वन विभागाच्या सर्वेक्षणानुसार, ३०४ चौरस किलोमीटर परिसरात कांदळवने आहेत. ३४४ चौरस किलोमीटरवर सिडकोने नवी मुंबई वसवली आहे. नवी मुंबई शहराएवढेच कांदळवनांचे क्षेत्र आहे. त्यामुळे शहराला एकप्रकारे कांदळवनांचे संरक्षण कवच मिळाले आहे. ज्या गावांच्या अथवा शहरांच्या किनारी कांदळवनांचे क्षेत्र अधिक असते, अशा शहरांना पुराचा धोका कमी असतो. त्यामुळे नवी मुंबई शहराच्या नैसर्गिक संकटांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कांदळवनांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
कांदळनांच्या कत्तलीवर वन विभागाने कठोर कायदे आणि शिक्षेची तरतूद केल्यामुळे नवी मुंबईतील बेलापूर, नेरूळ, वाशी, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली परिसरात कत्तलींचे प्रमाण कमी झाले आहे. या भागात कांदळवनांची घनता वाढल्‍याने दुर्मिळ आणि नष्ट होत चाललेले जीव पुन्हा दिसू लागले आहेत. कांदळवने निसर्ग पर्यटन, कांदळवन सहल, फ्लेमिंगो सफारी, जैवविविधता दर्शन, शोभिवंत मत्स्यपालन, मत्स्य उत्पादन आणि जतन आदी उपक्रमांमुळे कांदळवनांचे फायदे स्थानिक नागरिकांच्या लक्षात येत आहेत.
सागरी आणि गोड्या पाण्यातील शोभिवंत माशांचे संगोपन सुरू करण्यात आले आहे. ऐरोलीच्या ‘किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्रा’त क्लाउन फिशसारख्या शोभिवंत माशांचे उबवणी केंद्र अनेक दिवसांपासून स्थापित करण्यात आले आहे. या भागात दरवर्षी येणाऱ्या फ्लेमिंगोंचा मुक्कामही वाढला आहे. पूर्वी पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात येणारे प्रवासी पक्षी उन्हाळ्याची चाहूल लागल्यानंतर परतण्याच्या मार्गावर असायचे; पण आता या पक्ष्यांना खाद्य मिळत असल्याने त्यांचा मुक्काम वाढला असल्याचा अंदाज पक्षी तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या भागाला भेटी देणाऱ्या पर्यटकांचे प्रमाणही वाढले आहे.
---------------------------------------------
ऐरोलीच्या जैवविविधता केंद्रातील पर्यटकांची संख्या
२०१७-१८ - ६,१३४
२०१८-१९ - १०,१८३
२०१९-२० - १०,०५६
२०२०-२१ - ११,२५२


कांदळवनांवर आधारित निसर्ग पर्यटन
महाराष्ट्राच्या किनारपट्टीत कांदळवनांची घनदाट जंगले आहेत. या पट्ट्यात अनेक सामाजिक संघटनांनी निसर्ग पर्यटनाची क्षमता असणारी काही ठिकाणे शोधली आहेत. संघटनेच्या माध्यमातून नौका स्वारी, निसर्ग भ्रमंती, न्याहरी निवास, पारंपरिक जेवण आदी उपक्रम सुरू झाले आहेत. त्याच धर्तीवर नवी मुंबईतील खाडी किनारी राहणाऱ्या स्थानिक महिलांच्या बचत गटांना स्वयंरोजगाराची संधी निर्माण झाली आहे.

वाशी खाडीत खेकडे पालन
वाशीच्या खाडी किनारी स्थानिक महिलांकडून खेकडे पालन केले जाते. खाडी किनारी असणाऱ्या दलदलयुक्त चिखलात खेकडे पाळले जातात. एक किलो ते अगदी चार किलोपेक्षा जास्त वजनाचे खेकडे खाडीत तयार होतात. या खेकड्यांना मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातील नामांकित हॉटेलमध्ये मोठी मागणी आहे; तर काही वेळा परदेशातही या खेकड्यांची निर्यात केली जाते.

मध्यंतरी कांदळवनाच्या मुळाजवळ दिसणारी माती पूर्णपणे प्लास्टिकच्या कचऱ्याखाली गेली होती. आमच्यासारख्या अनेक संघटनांनी कचरा स्वच्छ केल्यामुळे पुन्हा माती दिसायला लागली आहे. त्या मातीत प्राणी, जीव व पक्ष्यांच्या पायांचे ठसे दिसू लागले आहेत.

- धर्मेश बरई, सेव्ह एन्व्हायरमेंट संघटना.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82229 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top