
एसटी थांबा न घेणाऱ्यांवर कारवाई होणार
मुंबई : राज्यभरात शहरांसह शहराबाहेरील उड्डाणपुलांखाली एसटीचे बस थांबे देण्यात येऊनही एसटी पुलांवरून सुसाट निघून जात असल्याचे निर्देशनास येते. त्यामुळे आता अशा एसटी चालक-वाहकांवर विशेष पथकाद्वारे कारवाई केली जाणार आहे. राज्यभरातील विभाग नियंत्रकांना वाहतूक व्यवस्थापकांकडून तसे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नांदेडसह अनेक भागांतून एसटीच्या मुख्यालयात याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे.
एसटी मध्यवर्ती कार्यालयांकडून अनेक वेळा उड्डाणपुलांवरून बस न नेता पुलाखाली असलेल्या थांब्यांवर बस थांबे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र तरीही चालक-वाहकांकडून तसेच स्थानक प्रशासन, व्यवस्थापनाकडून त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. बस थांब्यांवर न येता पुलावरून जात असल्याने पुलाखाली थांब्यांवर थांबलेल्या प्रवाशांना एसटीसाठी तासनतास रेंगाळावे लागते, अखेर नाईलाजास्तव खासगी प्रवासी वाहतुकीचा पर्याय स्वीकारावा लागतो. परिणामी एसटीच्या उत्पन्नालाही फटका बसत आहे. प्रवासी संघटना आणि प्रवाशांकडून याबाबत एसटी मुख्यालयाकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे यापुढे आता विशेष पथकाद्वारे तपासणी करून अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82236 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..