
केतकी चितळे ठाणे पोलिसांच्या ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री केतकी चितळे यांच्याविरोधात कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची गांभीर्याने दाखल घेत कळवा पोलिस आणि ठाणे गुन्हे शाखेच्या घटक १ यांनी समांतर तपास करून नवी मुंबईतील कळंबोली येथून चितळे यांना ताब्यात घेतले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उद्देशून निखिल भामरे नामक व्यक्तीने वादग्रस्त ट्विट केल्याची घटना ताजी असताना, दुसरीकडे समाज माध्यमावर मराठी अभिनेत्री केतकी चितळे यांनीही पवार यांच्याविरोधात वादग्रस्त ट्विट करीत नवा वादंग निर्माण केला आहे. वकील नितीन भावे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर लिहिलेल्या वादग्रस्त कवितेतील ओळी केतकी चितळे यांनी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. त्यात त्यांच्या प्रकृतीवर आधारित खालच्या पातळीवर आक्षेपार्ह असे भाष्य केले गेले आहे. ते ब्राह्मणांच्या विरोधात असल्याचा आरोप केला आहे. या विधानावरून राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते संतप्त झाले असून, त्यांनी या वादग्रस्त ट्विट प्रकाराबाबत राष्ट्रवादीच्या वतीने कळवा पोलिस ठाण्यात केतकी चितळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत, ठाणे गुन्हे शाखा घटक १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कृष्ण कोकणी आणि त्यांच्या पथकाने नवी मुंबईतील कळंबोली येथून केतकी चितळे यांना ताब्यात घेतले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82266 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..