पदोन्नती आरक्षणासाठी आक्रोश मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पदोन्नती आरक्षणासाठी आक्रोश मोर्चा
पदोन्नती आरक्षणासाठी आक्रोश मोर्चा

पदोन्नती आरक्षणासाठी आक्रोश मोर्चा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्राने मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण सुरू करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत; मात्र राज्य सरकारने या निर्देशाचे पालन न केल्याने आरक्षण हक्क कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पदोन्नती आरक्षणाच्या मागणीसाठी २६ जूनला राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी मंत्रालयावर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा समितीने दिला. तसेच या मुद्द्यावर १२ जूनला राज्यस्तरीय चिंतन परिषद आयोजित केली आहे.

पदोन्नतीतील आरक्षणाबद्दल राज्य सरकारला दिलेल्या आदेशानुसार राज्यात सरकारी नोकरीतील मागासवर्गीयांचे थांबवलेले ३३ टक्के आरक्षण सुरू करावे, यासाठी आरक्षण हक्क कृती समिती गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. मात्र, यानंतरही राज्य सरकारने आरक्षण लागू केलेले नाही. त्यामुळे समितीने महाराष्ट्र दिनी आझाद मैदानावर आंदोलन केले. या वेळीही मुख्यमंत्र्यांनी समितीला चर्चेसाठी बोलावले नसल्याने समितीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याने समितीच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव, विधी व न्याय विभागाचे सचिव, संबंधित विभागाचे मंत्री यांच्याविरुद्ध न्यायालयात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाईची याचिका करण्यात येणार आहे.

न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार
राज्य सरकारने मागासवर्गीयांचे ३३ टक्के आरक्षण रद्द केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. मागासवर्गीयांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याने याबाबत भूमिका ठरविण्यासाठी राज्यातील एससी, एसटी, व्हीजे, एनटी, एसबीसी, ओबीसीच्या सर्व संघटनाच्या प्रमुख पदाधिकारी प्रतिनिधींची चिंतन परिषद मुंबईमध्ये १२ जून रोजी घेण्यात येणार आहे. तसेच २६ जून रोजी मंत्रालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे, समितीचे राज्य समन्वयक एस. के. भंडारे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82270 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top