बनावट कॉलसेंटर प्रकरणात पोलीस कर्मचारी अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बनावट कॉलसेंटर प्रकरणात पोलीस कर्मचारी अटकेत
बनावट कॉलसेंटर प्रकरणात पोलीस कर्मचारी अटकेत

बनावट कॉलसेंटर प्रकरणात पोलीस कर्मचारी अटकेत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथील पोलिसांनीच लूट केल्याची घटना ताजी असताना, एका बनावट कॉल सेंटरमध्ये पोलिसाची भागीदारी असल्याची बाब उघडकीस आली आहे. बनावट कॉल सेंटर तयार करून मोबाईल नियंत्रित करणाऱ्या ॲपद्वारे (रिमोट ॲप) अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना या कॉलसेंटरमध्ये भागीदार असलेल्‍या ठाणे पोलिस दलातील हवालदार प्रमोद धाडवे यास अटक केली आहे.
ठाण्यातील कापूरबावडी येथील एका मॉलमध्ये बनावट कॉल सेंटर सुरू करण्यात आले होते. या माध्यमातून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक केली जात होती. फेब्रुवारी महिन्यात खंडणीविरोधी पथकाने हे बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त केले होते. तसेच सहा जणांना अटक केली होती. या प्रकरणाचा अधिक तपास केला असता, त्याचे धागेदोरे कोलकातापर्यंत पोहचले होते. याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यप्रणाली कक्षाचा पोलिस हवालदार प्रमोद धाडवे हा आरोपींच्या संपर्कात होता, अशी माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी धाडवेला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता तो कॉलसेंटरमध्ये भागीदार असल्याचे समोर आले. धाडवे आणि इतर आरोपींमध्ये बॅंक खात्यातून आर्थिक व्यवहारही झाले आहेत. धाडवेला या कॉल सेंटरच्या माध्यमातून किती पैसे मिळत होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
धाडवेची पार्श्वभूमी
धाडवे हा २०२० मध्ये गुन्हे अन्वेषण शाखेच्या भिवंडी युनिटमध्ये कार्यरत असताना, आरोपी हे भिवंडीत बार आणि रेस्टॉरंट चालवित होते. त्या वेळी धाडवेची आरोपींशी ओळख झाली होती. त्यानंतर २०२१ मध्ये बनावट कॉल सेंटर सुरू करून त्यात धाडवेला भागीदार करून घेतल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82272 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top