
आम्हाला वारंवार डिवचू नये
भिवंडी, ता. १४ (बातमीदार) : आम्ही सहनशीलता बाळगून शांत राहतो म्हणून आम्हाला कोणी वारंवार डिवचू नये; अन्यथा आम्हीसुद्धा आमच्या हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, असा इशारा समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आजमी यांनी दिला.
भिवंडीत झालेल्या शांतीनगर अमजदीया मस्जिद रोड येथे पार पडलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर आमदार रईस शेख, भिवंडी शहराध्यक्ष रियाज आजमी यांसह मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी उपस्थित होते. भोंगे व हनुमान चालिसा या मुद्द्यांचा उल्लेख न करताच मुस्लिम समाजाने या वादातही सहनशील राहून समाजात तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घेत शांतता बाळगली, याबद्दल त्यांनी मुस्लिम समाजबांधवांचे आभार मानत विरोधकांनी मुस्लिम समाजबांधवांचा सहनशीलतेचा अंत कुणी पाहू नये, असा इशारा दिला.
मुस्लिम धर्मीयांच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न
देशात राज्यघटनेचा अपमान केला जात आहे. स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या पक्षाने कधी मंदिर, मस्जिद; तर कधी धार्मिक विध्वंस घडवीत देशावर सत्ता मिळवली आहे. काही जण जाणूनबुजून मुस्लिमधर्मीयांच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न आहेत. मात्र हिंदू व मुस्लिम समाजबांधव हुशार आहे, या देशात गंगा-जमुनाची संस्कृती आहे. सर्व हिंदू-मुस्लिम एक होऊन राहतील, असा विश्वास अबू आजमी यांनी व्यक्त केला. भिवंडीच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी राज्य सरकारकडून मंजूर करून घेतला; पण पालिकेतील भ्रष्ट सत्ताधारी त्यामध्ये अडथळे निर्माण करीत असल्याचा आरोप आमदार रईस शेख यांनी केला. रात्री आठ वाजता झालेल्या या सभेत पाच हजारांहून अधिक मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82274 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..