अभिनेत्री केतकी चितळेला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनेत्री केतकी चितळेला अटक
अभिनेत्री केतकी चितळेला अटक

अभिनेत्री केतकी चितळेला अटक

sakal_logo
By

ठाणे, ता. १४ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरोधात समाज माध्यमावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकने रात्री उशिरा अटक केली. ठाणे गुन्हे शाखेने तिच्यावर भारतीय दंड संहिता १८६० प्रमाणे ५०५ (२), ५००, ५०१ आणि १५३ कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तत्पूर्वी दुपारी नवी मुंबईतील कळंबोली येथून तिला ताब्यात घेण्यात आले. तिच्याविरोधात कळवा आणि ठाणे नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे आणि पुण्यातही तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

वकील नितीन भावे यांनी शरद पवार यांच्यावर लिहिलेल्या वादग्रस्त कवितेतील ओळी केतकीने समाज माध्यमावर शेअर केल्या आहेत. त्यात त्यांच्या प्रकृतीवर आधारित खालच्या पातळीवर आक्षेपार्ह असे भाष्य केले गेले आहे. केतकीच्या पोस्टवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. राष्ट्रवादीच्या वतीने केतकीविरोधात कळवा पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, ठाणे गुन्हे शाखा घटक एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कृष्ण कोकणी आणि त्यांच्या पथकाने नवी मुंबईतील कळंबोली येथून केतकीला ताब्यात घेतले आणि चौकशीनंतर तिला अटक करण्यात आली. केतकीच्या कृत्याचा सर्वपक्षीय नेत्यांनी कठोर शब्दांत निषेध केला आहे.

शाई आणि अंडी फेकून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून निषेध
नवी मुंबई (वार्ताहर) : कळंबोली पोलिस ठाण्याच्या बाहेर आल्यानंतर केतकी चितळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. काही कार्यकर्त्यांनी तिच्याविरोधात घोषणाबाजी करत तिच्यावर शाई आणि अंडी फेकली. मुंबई आणि पुण्याच्या संतप्त महिला पदाधिकाऱ्यांनी कळंबोली पोलिस ठाण्याबाहेर तिचा जोरदार निषेध केला. केतकीला कळंबोली पोलिसांनी शनिवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्यानंतर तिला ठाणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तिला रुग्णालयात नेण्यात येत असताना तिच्यावर शाई आणि अंडी फेकण्यात आली. ‘केतकी हाय हाय...’च्या घोषणाही देण्यात आल्या. काहींनी तिला धक्काबुक्कीही केली.
सात महिन्यांपासून केतकी कळंबोलीतील अव्हेलोन इमारतीत राहत आहे. कळंबोली पोलिसांनी दुपारी तिला ताब्यात घेतले. तिचा जबाब नोंदवण्यात आला आणि त्यानंतर तिचा ताबा ठाणे पोलिसांना देण्यात आला. तिला वाशीतील रुग्णालयात घेऊन जात असताना, कळंबोली पोलिस ठाण्याबाहेर जमलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी तिच्यावर शाई व अंडी फेकून तिच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी केतकीला कडेकोट बंदोबस्तात रुग्णालयात नेले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82283 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top