
भारतीय क्रूझ उद्योगाला सर्वात मोठा करण्याचे ध्येय
भारतीय क्रूझ उद्योगाला सर्वात मोठा करण्याचे ध्येय
दहा वर्षांत आठ ते दहापट वाढणार
मुंबई, ता. १४ ः भारताच्या समुद्रकिनाऱ्यांप्रमाणेच देशांतर्गत नद्यांमध्येही क्रूझ पर्यटन लोकप्रिय करण्यात येईल. भारतीय क्रूझ पर्यटन उद्योगाला जगात सर्वांत मोठे केले जाईल, असे केंद्रीय नौकावाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज येथे सांगितले. येथे आयोजित केलेल्या पहिल्यावहिल्या अतुल्य भारत आंतरराष्ट्रीय क्रूझ कॉन्फरन्सचे उद्घाटन करताना ते बोलत होते. भारतीय क्रूझ उद्योगाला उज्ज्वल भवितव्य असून त्यामुळे लाखो तरुणांना रोजगार मिळेल, असा विश्वासही या वेळी जाणकारांनी व्यक्त केला.
देशातील साडेसात हजार किलोमीटरची समुद्रकिनारपट्टी व साडेचौदा हजार किलोमीटरच्या मोठ्या नद्यांमध्ये क्रूझ पर्यटनासाठी सुविधा दिल्या जातील. आपला क्रूझ उद्योग जगात सर्वात मोठा करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. यासाठी आधुनिक सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली जातील. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून येत्या पाच वर्षांत भारत हे क्रूझ टुरिझममधील सर्वात जास्त आकर्षक ठिकाण होईल, असा विश्वास सोनोवाल यांनी व्यक्त केला.
आता क्रूझ उद्योगात हेरिटेज, वैद्यकीय, आयुर्वेद, कोस्टल, रिव्हर, टुरिस्ट अशी वेगवेगळी सर्किट येणार असल्याने पुन्हा दहा वर्षांत हा उद्योग आठ ते दहा पट वाढेल. प्रवासी संख्या ४० लाखांपर्यंत जाईल, असा विश्वास नौकावाहतूक खात्याचे सचिव संजीव रंजन यांनी व्यक्त केला; तर देशातील क्रूझ उद्योग येत्या पाच वर्षांत वेगात वाढेल व जगातील पहिल्या पाच क्रूझ उद्योगांमध्ये त्याची गणना होईल, असे फिक्कीचे ध्रुव कोटक म्हणाले. परदेशातील क्रूझ टर्मिनसप्रमाणे सोयीसुविधा, कमीत कमी करजाळे, तसेच प्रवाशांसाठी इमिग्रेशन व कस्टम प्रक्रिया वेगवान या क्रूझ उद्योगाच्या भारताकडून अपेक्षा आहेत. त्यासंदर्भात उद्योगाने निवेदन द्यावे, त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न होईल. गंगा व ब्रह्मपुत्रा या मोठ्या नद्यांमधूनही क्रूझ पर्यटन सुरू केले जाईल, असे केंद्रीय नौकावाहतूक खात्याचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले.
----
मुंबईत १० लाख प्रवासी
भारतीय क्रूझ पर्यटन उद्योगात मोठ्या प्रमाणावर संधी आहे. कोविडची भीती जात असल्याने व्यवसाय वृद्धीसाठी याहून दुसरी चांगली वेळ सापडणार नाही, असे मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा म्हणाले. सन २०२९ पर्यंत मुंबईसाठी पाच क्रूझ धक्क्यांची गरज असून मुंबई क्रूझ टर्मिनस जुलै २०२४ मध्ये पूर्ण होईल. त्यानंतर तेथे वर्षाला २०० जहाजे व दहा लाख प्रवासी हाताळले जातील.
----
तीन ट्रेनिंग अकादमी
या क्षेत्राला कुशल मनुष्यबळ मिळावे, यासाठी गोवा, केरळ व पश्चिम बंगाल येथे क्रूझ ट्रेनिंग अकादमी स्थापन केल्या जातील, असेही सोनोवाल म्हणाले.
---
केळशी दीपगृहाचे उद्घाटन
सोनोवाल यांच्या हस्ते मुंबई बंदरातील पीरपावच्या तिसऱ्या केमिकल बर्थचे दृक्-श्राव्य माध्यमातून उद्घाटन झाले. तसेच कोकणातील आंजर्ले-केळशी दीपगृहाचे उद्घाटनही करण्यात आले. स्थानिक मच्छीमारांच्या मागणीवरून दहा हजार चौरस मीटर जागेत हे दीपगृह उभारण्यात आले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82288 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..