
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १४ : नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी अखेर निवडणूक आयोगाने प्रभाग रचना जाहीर केली आहे. बहुसदस्यीय पद्धतीने पहिल्यांदा होणाऱ्या या निवडणुकीसाठी एकूण ४१ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. उद्या महापालिकेच्या संकेतस्थळावर सर्वांना प्रभाग रचना, नकाशे आदी माहिती उपलब्ध होणार आहे.
नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ ची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने ११ मे २०२२ च्या शासन राजपत्रात प्रभाग रचना प्रसिद्ध केली आहे. सदरील अंतिम प्रभाग रचना अधिसूचनेची (मराठी व इंग्रजी) प्रत, नकाशा व सर्व परिशिष्टे नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय आणि सर्व विभाग कार्यालय येथील नोटीस बोर्ड, तसेच www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी ही प्रभाग रचना पाहिल्यानंतर पुढच्या टप्प्यात महिला आरक्षण काढले जाणार आहे. त्यासाठी सोडत जाहीर होणार आहे. नवी मुंबई महापालिकेसाठी तयार केलेल्या प्रभाग रचनेवर भाजप आणि इतर राजकीय पक्षांनी विरोधकांना पोषक असल्याचे आरोप केले होते. भाजपने याबाबत थेट राज्यपालांकडे तक्रार केली होती; परंतु आता प्रत्यक्ष प्रभाग रचना जाहीर झाल्यामुळे केलेल्या आक्षेपानंतर बदल केले आहेत की नाही, हे स्पष्ट होणार आहे. महापालिकेची १११ नगरसेवक संख्या १२२ झाली असून त्यानुसार ४१ प्रभागांची रचना तयार करण्यात आली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82289 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..