
श्रीसदस्यांकडून मुंबईत महास्वच्छता अभियान
घाटकोपर, ता. १५ (बातमीदार) ः पद्मश्री डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून आज (ता. १५) मुंबई विभागात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या श्रीसदस्यांकडून महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.
मुंबई विभागात एफ नॉर्थ, एल वार्ड, एम इस्ट, एम वेस्ट, एन वार्ड आदी विभागांत हे स्वच्छता अभियान घेण्यात आले. यात एक एसटी डेपो, दोन गार्डन, १७ पोलिस ठाणे, तीन बस डेपो, नऊ सरकारी रुग्णालये, १४ हिंदू स्मशानभूमी, कब्रस्तान, ख्रिश्चन स्मशानभूमी अशा स्थळांची श्रीसदस्यांकडून स्वच्छता करण्यात आली. या महास्वच्छता अभियानात हजारांहून अधिक श्रीसदस्य उपस्थित होते. या वेळी २६,३०९ किलो सुका कचरा आणि ८१३ ओला कचरा श्रीसदस्यांकडून जमा करण्यात आला.
सहायक आयुक्त संजय सोनवणे म्हणाले, धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य नेहमीच कौतुकास्पद राहिले आहे. वेळेत आणि शांततेत हे कार्य पार पडते हे खरोखरच देशासाठी आदर्शवत आहे. श्री सदस्यांच्या या सामाजिक कार्यामुळे इतरांनादेखील प्रेरणा मिळते आहे. राजावाडी रुग्णालय, मुक्ताबाई रुग्णालय, पोलिस ठाणे येथील स्वच्छता आम्ही पाहिली. इतकी सुंदर स्वच्छता ही मनात असलेल्या देशप्रेमातूनच होऊ शकते.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय डहाके म्हणाले, स्वच्छता मोहिमेत श्रीसदस्यांनी मिळेल ते काम अगदी चोख पार पाडले आहे. सकाळी लवकर उठून वेळेत कार्य पार पडणे हे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिन धर्माधिकारी यांनी त्यांच्या अध्यात्मातून दिलेली शिकवण आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82326 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..