
‘कृषी’चे जीडीपीमधील योगदान यंदा २० टक्के शक्य
मुंबई, ता. १५ ः या वर्षी वेळेवर आणि समाधानकारक पाऊस पडण्याची अपेक्षा असल्याने आपल्या कृषिक्षेत्राचे जीडीपीमधील योगदान प्रथमच वीस टक्क्यांपर्यंत जाण्याची अपेक्षा असल्याचे मत सॉलव्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी व्यक्त केले आहे.
देशातील तेल उत्पादक कंपन्या व तेल व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या एसईएतर्फे दुबईत नुकत्याच झालेल्या ग्लोबऑईल इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये हा अंदाज व्यक्त केला आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे सूर्यफूल तेलाची एप्रिलमधील आयात चांगलीच घटली आहे; पण यंदा आपली तांदूळ व साखरेची निर्यात मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या वर्षी बासमतीसह तांदळाची निर्यात दोन कोटी टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे, तर साखरेची निर्यातही ९० लाख टन होण्याची शक्यता आहे. गेली अनेक वर्षे कृषिक्षेत्राचे जीडीपीमधील योगदान पंधरा ते सोळा टक्के होते. या वर्षी वेळेवर व चांगला पाऊस अपेक्षित असल्याने कृषीचे जीडीपीमधील योगदान २० टक्क्यांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. या वर्षी मार्चअखेरपर्यंत आपण कृषिमालाची ५० अब्ज डॉलरची निर्यात केली आहे. यामुळे ग्रामीण शेतकऱ्यांना पैसे मिळतील, असेही चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.
...
युद्धामुळे खाद्यतेलाची आयात घटली
नोव्हेंबर ते मार्चअखेरपर्यंत भारताने अकरा लाख टनांपेक्षाही जास्त सूर्यफुलाचे खाद्यतेल आयात केले. मात्र एप्रिलमध्ये रशिया व युक्रेनकडून येणारा तेलसाठा बंद झाला. त्या महिन्यात आपण फक्त अर्जेंटिनाकडून ५६ हजार ४२६ टन सूर्यफुलाचे तेल आयात केले. इंडोनेशियाने पामतेलाच्या निर्यातीवर बंदी घातली असली तरी या महिन्याअखेरपर्यंत ती उठवली जाण्याची शक्यता आहे. ती बंदी उठली नाही तर परिस्थिती वाईट होईल, असे एसईएचे कार्यकारी संचालक बी. व्ही. मेहता यांनी म्हटले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82327 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..