
पालघर जिल्ह्यात हत्तीरोगाचा शिरकाव
पालघर, ता. १५ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात ऑक्टोबर २०२१ मध्ये राबविण्यात आलेल्या संक्रमण पडताळणी सर्वेक्षण मोहिमेत ६ ते ७ वर्षे वयोगटातील लहान मुलांची तपासणी करण्यात आली. यात २९ बालके हत्तीरोगाने संक्रमित असल्याचे आढळून आले; तर २०१६ ते २०२२ या कालावधीतील विविध सर्वेक्षणात डहाणू, विक्रमगड, तलासरी या तीन तालुक्यांत १४७ व्यक्ती हत्तीरोग संक्रमित आढळून आले आहेत. या रोगाच्या शिरकावाने जिल्हा आरोग्य विभाग सतर्क झाले असून, सामुदायिक औषधोपचार मोहीम राबवण्यात येत आहे.
पालघर जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून (लिम्पॅटिक फिलारिसिस) हत्तीरोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. हा आजार ‘क्युलेक्स’ प्रजातीच्या डासांमार्फत मानवास होतो. सेप्टिक टँक, घाण, कचऱ्याच्या जागी व गटारे अशा दूषित जागी या डासांची पैदास होते. हाता-पायाला सूज येते. हा डास चावल्यानंतर सूक्ष्मजीव शरीरात प्रवेश करतो. ५ ते १० वर्षांनंतर या आजाराची लक्षणे जाणवतात. सुरुवातीच्या काळात रुग्ण याबाबत अनभिज्ञ राहत असल्याने हा रोग अधिक बळावतो.
दरम्यान, हत्तीरोगाचा प्रादुर्भाव झाल्याने डहाणू, विक्रमगड, तलासरी या तीन तालुक्यांत २५ मे ते ५ जून या कालावधीत सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे.
रोगाच्या शिरकावाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसाळ यांनी आवश्यक जनजागृतीसाठी सर्व यंत्रणांना सूचना दिल्या आहेत. २५ मेपासून राबविण्यात येणाऱ्या सामुदायिक औषधोपचार मोहिमेत सर्व नागरिकांना हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समक्ष खाव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यात जिल्ह्यातील सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बालकांचे भवितव्य हत्तीरोग मुक्त ठेवण्यासाठी मुले, प्रौढ व्यक्ती व वयोवृद्ध या सर्वांनी हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळ्यांचे प्रत्यक्ष सेवन करणे आवश्यक आहे.
- डॉ. सागर पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82358 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..