बाईक टॅक्सी वाहतूक सुसाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाईक टॅक्सी वाहतूक सुसाट
बाईक टॅक्सी वाहतूक सुसाट

बाईक टॅक्सी वाहतूक सुसाट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १५ : राज्य सरकारने महाराष्ट्रात अद्याप रॅपिडो बाईक टॅक्सीला अधिकृत परवानगी दिली नाही. त्यानंतरही सध्या मुंबईत ६ रुपये प्रतिकिलोमीटर दराने सर्रास बाईक टॅक्सी सेवा सुरू आहे. नुकताच परिवहन विभागाने काही ॲप बेस्ड टॅक्सी कंपन्यांना काही अटी-शर्तींच्या आधारावर प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली होती; मात्र त्यामध्ये रॅपिडोचा समावेश नाही. त्यानंतरही प्रवासी वाहतूक केली जात असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आधीच टॅक्सी, रिक्षामध्ये महिला प्रवाशांच्या छेड काढण्याच्या घटना होत असताना, परिवहन विभागाकडून रॅपिडो बाईक टॅक्सीवर ठोस कारवाई होताना दिसत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
आतापर्यंत मुंबईतील काही भागांमध्ये वाहतूक पोलिसांनी रॅपिडो बाईक टॅक्सीचालकांना वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगात वाहन चालवत असल्याच्या आरोपावरून कारवाई केल्याची माहिती परिवहन विभागाने दिली होती. मात्र, अनधिकृत बाईक टॅक्सी प्रकरणात रॅपिडोवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. शिवाय माध्यमांवर सर्रास रॅपिडो बाईक टॅक्सीच्या जाहिराती केल्या जात आहेत. परिणामी सर्वसामान्य प्रवासी बाईक टॅक्सी प्रवासाकडे आकर्षित होत आहेत.
बाईक टॅक्सी प्रवासी वाहतुकीला अद्याप परवानगी नसल्याने बेकायदा पद्धतीने ही प्रवासी सेवा मुंबईत आपले जाळ पसरवत आहे. अशा बाईक टॅक्सीवर अद्याप कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नसल्याने बाईक प्रवासी वाहतूक सुसाट सुरू आहे; परंतु अशा बाईक टॅक्सीवर वेळोवेळी कारवाई केली जात असल्याचे परिवहन विभागाकडून सांगितले जात आहे.
----------
रॅपिडो बाईक टॅक्सीचे ॲप
प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी रॅपिडो कंपनीने मोबाईल ॲप तयार केले असून, त्यावर बाईक टॅक्सीसुद्धा उपलब्ध असल्याचे दाखवले जात आहे. प्रवाशांच्या पहिल्या राईडला ५० टक्के सवलत दिली जात असून, ६ रुपये प्रतिकिलोमीटर दराने प्रवाशांना बाईक टॅक्सी भाडे अदा करावे लागत आहे.

महिला प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर
मुंबई महानगरात रात्री उशिरापर्यंत महिला कामानिमित्त घराबाहेर असतात. बहुतेक वेळा त्यांना ओला, उबर टॅक्सीचा वापर करावा लागतो. त्यातही महिलांसोबत गैरप्रकाराच्या घटनासुद्धा आतापर्यंत घडल्या आहे. मात्र बाईक टॅक्सीने महिला प्रवासी प्रवास करताना काही अनूचित प्रकार घडल्यास त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82392 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top