
सक्रिय रुग्णांसंख्येत चौपट वाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईतील कोविड रुग्णसंख्या हळूहळू वाढत असल्याचे समोर येत आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात सापडलेल्या कोविड रुग्णांची तुलना केल्यास एवढे रुग्ण संपूर्ण एप्रिल महिन्यात सापडले होते. मे महिन्यामध्ये सक्रिय रुग्णही सुमारे चौपट वाढले आहेत; मात्र अशा परिस्थितीतही मुंबईतील स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे.
मे महिन्याच्या पंधरवड्यात एप्रिल महिन्याच्या तुलनेत ९० टक्के रुग्णांची नोंद झाली. १ मे ते १४ मे या कालावधीत मुंबईत १,६४१ कोविड रुग्ण आढळले; तर संपूर्ण एप्रिल महिन्यात एकूण १,८२७ एवढे रुग्ण सापडले होते. महाराष्ट्रातही २,३५३ रुग्ण आतापर्यंत नोंदले गेले आहेत. म्हणजेच जवळपास ६० टक्के भार हा फक्त पहिल्या १५ दिवसांत अनुभवायला मिळाला. त्याच तुलनेत एप्रिलमध्ये ३,७०८ एवढे रुग्ण नोंदवण्यात आले होते.
रुग्ण वाढत आहेत, ही बाब जरी खरी असली, तरी यातून चिंता करण्याची गरज नाही. विशेष म्हणजे, मुंबई आणि पुण्यात पुन्हा रुग्ण वाढत आहेत; तर इतर जिल्ह्यांमध्ये फक्त एक अंकाने रुग्ण वाढत आहे, असे राज्याच्या वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी सांगितले, की आम्ही कोविडच्या सद्यस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. सध्याची परिस्थिती नियंत्रणात असून मुंबईकरांना काळजी करण्याची गरज नाही. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असेही ते म्हणाले.
बहुतेक रुग्ण लक्षणविरहित
शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या १ एप्रिलला २५० वरून ८९८ वर पोहोचली आहे; परंतु यात बहुतेक रुग्ण लक्षणविरहित आहेत. गेल्या दीड महिन्यात पाच मृत्यू नोंदले गेले आहेत. दररोज १५ ते २० रुग्ण सापडत आहेत. बहुतेक नागरिकांना चाचणीची आवश्यकता आहे. मात्र, त्यांच्यापैकी बहुतेकांना लक्षणेदेखील दिसत नाहीत, असे के पश्चिम प्रभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. अजित पंपटवार यांनी सांगितले.
रुग्णसंख्येचे निरीक्षण
मुंबई महापालिकेने शुक्रवारपर्यंतच्या सात दिवसांत रुग्णसंख्येचे निरीक्षण केले. त्यापैकी के पश्चिम प्रभागात १४२, एच पश्चिम प्रभागात १०६, जी दक्षिण ६६ आणि डी प्रभागात ६२ रुग्ण आहेत. एप्रिलमध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता. मे महिन्यातील पहिल्या मृत्यूची नोंद शुक्रवारी (ता. १३) झाली.
सध्याची परिस्थिती पाहता एकूणच मुंबईत रुग्ण पुन्हा वाढत आहेत. दररोज ५ ते ६ टक्क्यांनी वाढ होत आहे. २०० ते २५० सक्रिय रुग्णांचे निदान होत आहे; पण बरे होणाऱ्यांची संख्याही १७० ते १८० दरम्यान आहे. दररोजची कामे थांबवण्याची गरज नाही; पण नागरिकांनी गर्दीत जाताना मास्क वापरला पाहिजे. त्यात, सध्या चाचण्यांचे प्रमाण कमी आहे. नागरिकही चाचण्या करत नाहीत. त्यामुळे भीती कमी झाली आहे.
- डॉ. अविनाश सुपे, सदस्य, राज्य कोविड टास्क फोर्स
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82447 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..