
भाडेकपातीनंतर एसी लोकलला ‘ट्रॅकवर’
मुंबई, ता. १६ ः तिकीट दर कमी केल्यानंतर मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी एसी लोकलला उदंड प्रतिसाद दिला आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत मे महिन्यात प्रवाशांची संख्या वाढली आहे. फेब्रुवारीत रोजचे सरासरी प्रवासी ५९३९ होते. मे महिन्यात मात्र प्रवाशांची संख्या चार पटींनी वाढली आहे. रोजची सरासरी प्रवासी संख्या २६ हजार ८१५ वर गेली असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.
मध्य रेल्वे एसी लोकलसह एकूण १८१० उपनगरीय सेवा चालवते. १४ मेपासून मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण, टिटवाळा आणि अंबरनाथदरम्यान १२ एसी लोकल वाढल्या. आठवड्यातील एकूण एसी लोकलची संख्या ४४ वरून ५६ वर गेली आहे. मध्य रेल्वेने रविवारी आणि सुटीच्या दिवशी १४ अतिरिक्त एसी लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
५ मेपासून एकेरी प्रवासाच्या तिकीट दरात ५० टक्के कपात केल्यानंतर एसी लोकलला मिळणारा प्रतिसाद प्रचंड वाढला आहे. सीएसएमटी ते ठाणे प्रवासाचे तिकीट ९५ रुपये आहे. सीएसएमटी ते कल्याणदरम्यानचे भाडे १०५ रुपये आहे.
५ ते १५ मेपर्यंतची एसी लोकलची तिकीट विक्री
स्थानक तिकिटे
सीएसएमटी ः ८१७१
डोंबिवली ः ७५३४
कल्याण ः ६१४८
ठाणे ः ५८८७
घाटकोपर ः ३६९८
हार्बर रेल्वेमार्गावर एसी लोकल अपयशी ठरली. तेथील १४ एसी लोकलचा भार मुख्य मार्गावर जबरदस्तीने टाकण्यात आला आहे. त्याचा टिटवाळा आणि बदलापूरच्या प्रवाशांना कोणताही फायदा नाही. या भागातील ९५ टक्के प्रवासी अल्प उत्पन्न गटातील असल्याने त्यांना एसी लोकलचा प्रवास परवडणारा नाही.
- श्याम उबाळे, सरचिटणीस, कल्याण-कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82523 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..