
भिवंडी रोड रेल्वे स्थानकावरून पार्सल सेवेत वाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ ः भिवंडी रोड स्टेशन मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील सर्वात यशस्वी व्यवसाय विकास युनिट म्हणून उदयास आले आहे. गेल्या आर्थिक वर्षात येथून तब्बल १९ हजार २३४ टन पार्सलची वाहतूक करून गेल्या वर्षात तब्बल १० कोटीचे उत्पन्न मिळवले आहे. भिवंडी रोड, बिझनेस डेव्हलपमेंट युनिटची गेल्या वर्षात उत्तम कामगिरी बजावल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले.
गेल्या वर्षी एप्रिल ते मार्च २०२२ या कालावधीत भिवंडी रोड बिझनेस डेव्हलपमेंट युनिटने १६.२१ लाख पॅकेजेसमध्ये १९,२३४ टन पार्सल पाठवून १०.३३ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे. जे मागील वर्षीच एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत १०.४१ लाख पॅकेजमधून १४ हजार ९६३ टन पार्सल पाठवून ८.२७ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले होते.
वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलेल्या विविध वस्तूंमध्ये, परिमाण आणि पॅकेजच्या बाबतीत, सर्वात जास्त शालिमार येथे ७.९ लाख पॅकेजमधून ७,८७५ टन पार्सल पाठविण्यात आले; तर त्यामागोमाग आजरा (गुवाहाटी) येथे ४.३९ लाख पॅकेजेसमधून ६,६२१ टन पार्सल आणि त्यानंतर संकराईल गुड्स यार्ड (हावडा) येथे २.९० लाख पॅकेजमध्ये २,६२७ टन पार्सल पाठविण्यात आले आहे. त्याशिवाय उत्पन्नाच्या बाबतीत, आजरा ३.९८ कोटींसह आघाडीवर आहे. त्यानंतर शालीमार ३.९७ कोटी आणि संकराईल १.३१ कोटींसह तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे.
पार्सलमध्ये या वस्तूंचा समावेश
भिवंडी रोड येथील रेल्वे स्थानकांवरून करण्यात पाठवण्यात येणाऱ्या पार्सलमध्ये फर्निचर, रेफ्रिजरेटर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, औषधे, प्लास्टिकच्या वस्तू, पिशव्या, स्टेशनरी, वंगण तेल आणि लोकप्रिय ब्रँडच्या सौंदर्यप्रसाधनांचा समावेश आहे.
व्यावसायिक केंद्रात बदल
भिवंडीचे मुंबई आणि ठाणे शहराशी जवळिक, उत्तर-दक्षिण आणि जेएनपीटी बंदराशी रेल्वेद्वारे चांगली कनेक्टिव्हिटी, योग्य गोदाम आणि ई-कॉमर्स सुविधा आणि ट्रक आणि टेम्पोसाठी पुरेशी पार्किंगची जागा यासारखे अनेक फायदे आहेत. मध्य रेल्वेने भिवंडीच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे भिवंडीचा चेहरा ‘हॉल्ट स्टेशन’वरून महत्त्वाच्या व्यावसायिक केंद्रात बदलला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82524 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..