
ट्रेस पासिंग रोखण्याचे आव्हान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ ः रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करू नये, असे आवाहन वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना केले जाते; तरीही नागरिक या नियमाचे उल्लंघन करून अवैधरीत्या प्रवास करतात. मुंबई रेल्वे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अशाच ट्रेस पासिंगमुळे मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर आले आहे. यात रविवारी (ता. १५) दिवसभरात मध्य रेल्वेवर विविध कारणांमुळे एकूण ६ मृत्यू झाले. त्यापैकी ५ मृत्यू रेल्वे रूळ ओलांडल्यामुळे झाले. यामध्ये कल्याणमध्ये दोन अपघाती मृत्यू झाले असून, सीएसएमटी, ठाणे, वसई येथे प्रत्येकी एका अपघाती मृत्यूची नोंद रेल्वे पोलिस आयुक्तालयात झाली आहे.
मुंबई रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) यांनी ट्रेस पासिंमुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी जाहीर केली. रेल्वे पोलिस आयुक्त कार्यालयाकडून दैनंदिन गुन्ह्यांची नोंद केली जाते. त्यामध्ये रेल्वे अपघात आणि रेल्वे परिसरात घडणाऱ्या गुन्ह्यांची नोंद ठेवली जाते; मात्र यामध्ये विविध ठिकाणी रेल्वेने झालेल्या अपघाती मृत्यूची आकडेवारी लक्ष वेधून घेत आहे. रविवारी मध्य रेल्वे मार्गावर एकूण ६ अपघाती मृत्यू झाले. त्यापैकी एक लोकलमधून चक्कर येऊन पडल्याने झाला; तर इतर पाच मृत्यू ट्रेस पासिंग करताना झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. शिवाय ६ मृत्यूंपैकी २ मृतांची ओळख पटली असून, ४ मृतांची ओळख अद्याप पटली नसल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.
विविध १५ गुन्हे दाखल
मध्य रेल्वे मार्गावर मुंबई रेल्वे पोलिस आयुक्तालय हद्दीत घडलेल्या घटनांची, गुन्ह्यांची दररोज नोंद ठेवली जाते. १५ मे रोजीही विविध प्रकारचे १५ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी ३ गुन्हे उघड झाले आहेत. यामध्ये जबरीने मोबाईल खेचून चोरी करणे, चेन स्नॅचिंग, बॅग-पर्स, पॅकेट चोरी, अपहरण आणि चोरीचा प्रयत्न अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82533 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..