
रसदार, आंबटगोड लिची एपीएमसीत दाखल
वाशी, ता. १७ (बातमीदार)ः उन्हाळ्यात हंगाम सुरू असला तरी एपीएमसीतील घाऊक फळबाजारात कोलकाता आणि बिहारमधून येणाऱ्या लिचीची आवक सुरू झाली आहे. मे, जून या दोन महिन्यांत मुबलक प्रमाणात दिसणाऱ्या रंगाला लाल, रसदार, आंबट गोड लिचीची चांगली विक्री होत असून एक-दोन आठवड्यात आवक वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.
लिचीची मे महिन्यामध्ये फळबाजारांमध्ये आवक सुरू होते. लिचीचे अधिकतर उत्पादन पश्चिम बंगालमधील विविध भागांत होते. त्या खालोखाल बिहारमधील शेतकऱ्यांकडून लिचीची लागवड केली जाते. सद्यःस्थितीत वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळबाजारात कोलकाता आणि बिहारमधून येणाऱ्या लिचीची आवक सुरू झाली आहे. साधारण जून महिनाअखेपर्यंत लिचीचा हंगाम असतो. या दोन महिन्यांच्या कालावधीत नागरिकांना देशांतर्गत पिकणाऱ्या लिचीची चव चाखता येते. तर दोन महिन्यानंतर परदेशातून आयात केलेल्या लिचीची विक्री करण्यात येते.
वाशीतील फळबाजारात गेल्या काही दिवसांपासून लिचीची दररोज ५ ते ९ हजार किलो इतकी आवक होत आहे. घाऊक बाजारात लिचीची विक्री १० किलोच्या पेटीनुसार केली जात असून सध्या एका पेटीची विक्री १,५०० रुपये तर २ हजार रुपये इतक्या दराने होत आहे.
पोषक घटकांमुळे मागणी
लिची हे हंगामी फळ असल्याने ग्राहक आवर्जून खरेदी करतात. लिची खाल्याने त्वचा तजेलदार होण्यास आणि वजन कमी होण्यास मदत होते. उन्हाळ्यात जिभेला शीतलता देणाऱ्या लिचीत ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व असल्याने तसेच इतर पोषक घटक असल्याने शरीर स्वस्थ राहण्यास मदत होते.
सध्या लिचीचा हंगाम सुरू झाला असून कोलकाता आणि बिहारमधून आवक सुरू झाली आहे. ग्राहकांकडूनही आवर्जून खरेदी केली जात आहे. येत्या एक ते दोन आठवड्यात आवक वाढेल. जून अखेपर्यंत लिचीचा हंगाम सुरू राहणार असून नागरिकांना देशातील लिचीचा आस्वाद घेता येणार आहे.
- अशोक उंडे, फळविक्रेता, एपीएमसी
दररोज लिचीची आवक
५-९ किलो
१० किलोचा दर
१,५००-२,००० रुपये
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82569 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..