
बजेटच्या घरांअभावी ग्राहकांची पाठ
बेलापूर, ता. १७ (बातमीदार) : वाशी येथे भरविण्यात आलेल्या क्रेडाई-बीएएनएमच्या मालमत्ता प्रदर्शनाची सोमवारी (ता. १६) सांगता झाली. या प्रदर्शनात आपल्या बजेटमधील घर नसल्याने अनेक ग्राहकांनी पाठ फिरविली. त्यामुळे चार दिवसांच्या या प्रदर्शनात खरेदीदारांपेक्षा बघ्यांचीच संख्या जास्त असल्याचे निदर्शनास आले.
कोरोना महामारीमुळे रियल इस्टेट क्षेत्रातील अनेक प्रकल्प ठप्प पडले. जुन्या प्रकल्पांतील अनेक घरे विक्रीविना पडून राहिल्याने दोन वर्षांतही नवीन प्रकल्प सुरू झाले नाहीत. या मालमत्ता प्रदर्शनातून विकसकांना मोठ्या अपेक्षा होत्या. त्यानुसार अनेक विकसकांनी या प्रदर्शनात आपले स्टॉल्स मांडले होते. या प्रदर्शनात वीस लाखांपासून दहा कोटी रुपयांपर्यंतच्या घरांची घोषणा आयोजकांनी केली होती; परंतु बजेटमधील घराच्या शोधात असलेल्या सर्वसामान्य घटकांची या प्रदर्शनाने निराशा केली. काही मोजक्या स्टॉलच्या अपवाद वगळता बहुतांशी स्टॉल्सवर एक कोटीपेक्षा अधिक किमतीची घरे प्रदर्शनात मांडली होती. त्यामुळे या प्रदर्शनात गेलेला सर्वसामान्य ग्राहक गोंधळून गेल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
शहराबाहेरील प्रकल्पांची संख्या अधिक
कर्जत, नेरळ, खालापूर, खोपोली, बदलापूर विभागातील मालमत्तांच्या विक्रीसाठी स्टॉल मांडण्यात आले होते. ही घरे स्वस्त असली, तरी नवी मुंबईपासून दूर असल्याने ग्राहकांकडून त्याला फारशी संधी मिळाली नाही.
सिडकोकडून केवळ माहितीचे दर्शन
सिडकोच्या स्टॉलवर प्रस्तावित केलेल्या पंतप्रधान आवास योजनेतील आगामी गृह योजनांची माहिती दिली होती; परंतु माहिती देण्यासाठी सिडकोचा एकही प्रतिनिधी नसल्याने केवळ प्रदर्शित केलेली माहिती वाचून ग्राहक परत फिरत होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82571 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..