
कळवा रुग्णालय समस्यांचे आगार
किरण घरत ः सकाळ वृत्तसेवा
कळवा, ता. १७ ः दर वर्षी ठाणे महापालिका आपल्या अर्थसंकल्पात कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करते. रुग्णालय सुविधांच्या डागडुजीसाठी टेंडर काढले जाते; मात्र यात फक्त ठेकेदार गब्बर होत असून रुग्णांना आणि येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना सुविधा मिळत नसल्याचे चित्र आहे.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे एका परिचारिकेकडे चार रुग्ण खाटांचा भार आहे. रुग्णालयातील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. सफाई कामगार महिलांना कपडे बदलण्यासाठी जागा नाही, येथील कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप बंद आहे. तसेच सहा महिन्यांपूर्वी सुरू केलेले प्रसूतिगृहाचे काम बंद आहे. रुग्णालयात असलेले औषधाचे दुकान बंद आहे. ओपीडीत रुग्णांच्या रांगा लागलेल्या असतात, अशा एकाना अनेक समस्यांनी रुग्णालयाला घेरले आहे.
दोन दिवसांपूर्वी रुग्णालयातील परिचारिका व सफाई कामगारांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह एकत्र येत रुग्णालयाच्या अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षकांसमोर आपल्या समस्यांचा पाढा वाचला व आपल्या मागण्यांचे निवेदन दिले; मात्र त्यावर काहीच कारवाई झालेली दिसत नाही.
प्रसूतिगृहाचे काम धीम्या गतीने
गेल्या सहा महिन्यांपासून रुग्णालयात प्रसूतिगृहाच्या डागडुजीचे काम सुरू आहे. त्यामुळे येथे प्रसूतीसाठी येणाऱ्या अनेक गर्भवतींची गैरसोय होत आहे. शस्त्रक्रिया व्यतिरिक्त ओपीडी मध्ये नोंदणी न केलेल्या अनेक गरीब रुग्णांना इतर रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे.
३४८ रिक्ते पदे रिक्त
रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, सफाई, कामगार अशी ३४८ पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहे. रुग्णालय प्रशासनाने प्रस्ताव पाठवूनही ती भरण्यास दिरंगाई होत आहे. त्यामुळे कमी मनुष्यबळात काम करावे लागते आहे.
कमी वेतनात काम
सरकारच्या व महापालिकेच्या नियमानुसार रुग्णालयातील सफाई कामगाराला किमान २२ हजार रुपये किमान वेतन देय असताना व ३० दिवसांचा पगार देय असताना या कंत्राटी कामगारांचा हा ठेकेदार फक्त २६ दिवसांचा १५ हजार रुपये पगार देतो. उर्वरित रक्कम प्रशासनाचे अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपल्या पदरी पाडून घेतो, असा आरोप कर्मचारी करत आहेत.
दृष्टिक्षेपात
- गेल्या वर्षी पावसाळ्यात कंत्राटी कामगारांना छत्र्या व रेनकोट दिलेले नाहीत.
- रुग्णवाहिका आहे; पण चालक नाही
- संध्याकाळी सहानंतर मुख्य प्रवेशद्वार व लिफ्ट बंद
- मनुष्यबळाची कमतरता
-
गेल्या काही वर्षांपासून सुविधांसाठी मागण्या आम्ही रुग्णालय प्रशासनाकडे करीत आहेत. प्रशासनाने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. मागण्या महिन्याभरात पूर्ण न झाल्यास आम्ही आंदोलन करू.
- योगेश बोरसे, अध्यक्ष, धर्मवीर आरोग्य सेना
रुग्णालयातील रिक्त जागा व इतर काही सुविधा संदर्भात प्रस्ताव महापालिका प्रशासनकडे पाठवला आहे. कामगारांच्या मागण्या लवकरच पूर्ण केल्या जातील.
- अनिरुद्ध माळगावकर, वैद्यकीय अधीक्षक, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82573 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..