वर्षभरानंतरही तौत्के वादळाच्या जखमा कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्षभरानंतरही तौत्के वादळाच्या जखमा कायम
वर्षभरानंतरही तौत्के वादळाच्या जखमा कायम

वर्षभरानंतरही तौत्के वादळाच्या जखमा कायम

sakal_logo
By

अच्युत पाटील ः सकाळ वृत्तसेवा

बोर्डी, ता. १७ ः पहिल्या लाटेचा तडाखा बसल्यानंतर कोरोनाची दुसरी लाटही अधिक तीव्रतेने थैमान घालत होती... खाटांचा तुटवडा, ऑक्सिजनसाठी, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी नातेवाईक पळापळ करत होते. देशासह राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणा कोरोना रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते; परंतु अशा आणीबाणीच्या परिस्थितीत देशावर ‘तौत्के’ चक्रीवादळाचे अस्मानी संकट उभे राहिले. गेल्या वर्षी याच दिवशी हे संकट कोकण किनारपट्टीवर धडकले आणि सारे काही उद्‌ध्वस्त झाले. विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेल्या पालघर जिल्ह्यालाही या वादळाचा तडाखा बसला. येथील बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वर्षभरानंतरही येथील नागरिक, शेतकऱ्यांच्या या वादळाच्या जखमा कायम आहेत.
----------
तौत्के चक्रीवादळाने केरळ किनारपट्टीवर ताशी ६५ किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने धडक दिली. पुढे हे वादळ गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकले.
या वादळामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले. यापासून फळबागाही वाचल्या नाही. निसर्गापुढे मानवाचे काही चालत नाही, याचा प्रत्यय १८ व १९ मे २०२१ रोजी पालघरमधील जनतेने प्रत्यक्ष अनुभवला. येथील शेतकरी, मच्छीमार तसेच सर्वसामान्यांचे स्वप्न स्वप्न धुळीला मिळवणारे हे वादळ म्हणजे पालघर जिल्ह्याच्या विकासाला काही वर्षे मागे नेणारे ठरले.
वादळ येण्यापूर्वीच हवामान खात्याकडून खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्रशासकीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्कता बाळगली; परंतु वादळापासून होणारे नुकसान आवाक्याबाहेर होते. पालघर जिल्ह्यात बागायती शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. आंब्याचे पीक पुढील काही दिवसाच्या आत तयार होण्याच्या मार्गावर आले होते. हजारो टन आंबा दोन दिवसांच्या वादळी वाऱ्याने भुईसपाट झाला, पाच हजार हेक्टर चिकूची बाग वादळामुळे प्रभावित झाली. हजारो टन चिकू जमिनीवर पडून मातीमोल झाले.
वीज वितरण व्यवस्थाही पूर्णपणे विस्कळित झाली. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले, वीज वाहिन्या तुटल्या. पुढे अनेक दिवस वीजपुरवठा सुरळीत करण्यात गेला. याचा उद्योग धंद्यावर मोठा परिणाम झाला. या वादळाची आठवण काढल्यावर येथील शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरत आहे.

शेतकऱ्यांचे ‘पुन्हा लढ म्हणा...’
वादळानंतर झालेल्या नुकसानाने येथील शेतकऱ्यांना पुन्हा स्थिरस्थावर होण्याचे मोठे आव्हान होते. राज्य सरकारने काही भागात हेक्टरी ५० हजार रुपये तर काही बागांमध्ये नुकसान किती झाले, या अंदाजानुसार तुटपुंजी मदत केली; परंतु शेती हेच आपले उत्पादनाचे आणि उदरनिर्वाहाचे साधन असल्याने शेतकरीही खंबीरपणे या संकटाला सामोरे गेले.

मच्छीमारी व्यवसाय बुडाला
हंगामातील अखेरचा मच्छीमारी व्यवसाय तौत्के वादळामुळे बंद पडला. नौका किनाऱ्यावर नांगराव्या लागल्या. मुळातच कोरोना काळात डबघाईला आलेल्या या व्यवसायाला वादळाने खोल समुद्रात बुडविले. याचे परिणाम आजही पाहावयास मिळत आहेत. अनेक मच्छीमारांची उदरनिर्वाह करण्यासाठी मोठी ओढाताण होत आहे. त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. परिणामी कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे

सरकारी मदत तुटपुंजीच
१) तौत्के चक्रीवादळाने बागायतदार फारच संकटात सापडला. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातील चिकू उत्पादन भुईसपाट झाल्याने सुमारे पाच महिने शेतकऱ्याला उत्पन्नाचे साधनच नव्हते. अशा परिस्थितीत पुढील काळात उत्पन्न घेण्यासाठी मशागत व इतर खर्चासाठी पैसे नसल्यामुळे चिकू उत्पादनात मोठी घट झाली.
२) शेतकऱ्यांना मदतरूपाने सरकारकडून हेक्टरी ५० हजार रुपये किंवा नुकसानाप्रमाणे काही रक्कम दिली गेली असली तरी ती तुटपुंजी होती, असे महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी यांनी सांगितले. शेतकरी विमा योजनेपासूनही येथील शेतकरी वंचित राहिल्याचे ते म्हणाले.

हंगामाच्या अखेरीस मे महिन्याच्या ३० तारखेपर्यंत समुद्रात केलेल्या मासेमारीतून मिळालेल्या पैशांवर मच्छीमार पुढील हंगामासाठी नौका दुरुस्त करणे, नवीन जाळी खरेदी करणे, खलाशांना आगाऊ रक्कम देणे, तसेच आपल्या उदरनिर्वाहासाठी थोडीफार पुंजी जमा करणे आदी गोष्टी करतात. मात्र वादळामुळे हंगामातील शेवटची मासेमारी फुटल्याने मच्छीमाराला पुढील हंगामासाठी तयारी करता आली नाही. यामुळे २०२१-२२ चा हंगाम मच्छीमारांसाठी फलदायी ठरला नाही.
- राजू मजवेलकर, सदस्य, झाई मांगेला मच्छीमार सहकारी संस्था

पालघर जिल्ह्यात आंबा बागायत मोठ्या प्रमाणात आहे. या भागातील आंबा हा पावसाळ्याच्या सुरुवातीला तयार होत असल्यामुळे मुंबईच्या बाजारपेठेत फारशी मागणी राहत नाही; परंतु गुजरात राज्यात येथील केसर आणि हापूस आंब्याला कॅनिंगसाठी मोठी मागणी आहे. तौत्के वादळाने येथील आंबा भुईसपाट झाला. या आंब्याला अतिशय अल्पदर मिळाल्यामुळे वर्षभर केलेल्या मशागतीचा पैसादेखील मिळाला नाही.
- मीनाताई राऊत, आंबा बागायतदार

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82576 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top