मिरा-भाईंदरमध्ये आयुक्त-भाजप संघर्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरा-भाईंदरमध्ये आयुक्त-भाजप संघर्ष
मिरा-भाईंदरमध्ये आयुक्त-भाजप संघर्ष

मिरा-भाईंदरमध्ये आयुक्त-भाजप संघर्ष

sakal_logo
By

भाईंदर, ता. १७ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या मूळ अर्थसंकल्पात सत्ताधारी भाजपने केलेली वाढ रद्दबातल होण्याच्या मार्गावर आहे. आयुक्तांनी अर्थसंकल्पातील वाढीचा प्रस्ताव विखंडित करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठवण्याची तयारी केली असल्याचे खात्रिलायक वृत्त आहे. याच मुद्द्यावर मंगळवारी (ता. १७) आयोजित करण्यात आलेली स्थायी समितीची बैठक तहकूब करण्यात आली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावर आयुक्त आणि सत्ताधारी भाजप एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मिरा-भाईंदर महापालिकेच्या २०२२-२३ या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पाला ३० मार्चला महासभेने अंतिम मान्यता दिली होती; मात्र आता दीड महिना उलटल्यानंतरही अर्थसंकल्पाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. मुख्यत्वे करून नगरसेवक निधीची कामे प्रशासनाकडून अद्याप काढण्यात आली नाहीत. महापालिकेची मुदत संपायला अवघे तीन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे आपापल्या प्रभागातील विकासकामे आपल्या निधीतून करण्यासाठी नगरसेवकांची धडपड सुरू आहे. परंतु प्रशासनाने नगरसेवक निधीतील कामांना अद्याप मान्यता न दिल्याने नगरसेवकांमध्ये विशेष करून सत्ताधारी भाजपच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातातवरण आहे. याबाबतची तक्रार थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती.
सोमवारी (ता. १६) फडणवीस यांच्या हस्ते महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद्‌घाटन पार पडले. यावेळी फडणवीस यांनी नगरसेवकांसह, महापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या निधीतील कामे तात्काळ मंजूर करून त्यांना काम करण्याची संधी द्या, असा सल्ला आयुक्तांना दिला होता. त्यानंतर मंगळवारी आयोजित स्थायी समितीच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटले. नगरसेवक निधीतील कामे कधी करणार, असा प्रश्न स्थायी समितीत भाजपकडून उपस्थित करण्यात आला. त्यावर प्रशासनाने वाढीव अर्थसंकल्प विखंडित करायला पाठवल्याचे आणि नंतर तो विखंडित करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले. त्यामुळे संतप्त भाजप सदस्यांनी या विषयावर प्रशासन जोपर्यंत स्पष्टीकरण देत नाही, तोपर्यंत बैठक तहकूब करण्याची मागणी केली आणि सभापतींनी सभा तहकूब केली. यानिमित्ताने सत्ताधारी आणि आयुक्त यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

...तर भाजप अडचणीत
१)फेब्रुवारी महिन्यात प्रशासनाने १८१७ कोटी ९० लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला होता. त्यात सत्ताधारी भाजपने ४१० कोटी रुपयांची वाढ रुपयांची वाढ करून अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे पाठवला. महासभेतही त्यात वाढ झाली आणि २२५२ कोटी ६५ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला अंतिम मान्यता देण्यात आली. त्यामुळे मूळ अर्थसंकल्पात एकंदर सुमारे ४३५ कोटी रुपयांची वाढ झाली.
२) सत्ताधारी भाजपने महापालिकेच्या उत्पन्नाकडे लक्ष न देता खर्चाच्या बाजूत भरमसाठ वाढ केली असल्याचे आयुक्तांचे मत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळेच आतापर्यंत अर्थसंकल्पाची अंमलबाजवणी झाली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा वाढीव अर्थसंकल्प राज्य सरकारकडे विखंडित करण्यासाठी पाठवण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू झाली आहे. असे झाल्यास सत्ताधारी भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे.

सत्ताधारी भाजपने मंजूर केलेला अर्थसंकल्प लागू न करता आयुक्तांना स्वत:चा अर्थसंकल्प लागू करायचा आहे. ही लोकशाहीची गळचेपी आहे.
- हसमुख गेहलोत, उपमहापौर, मिरा-भाईंदर

महासभेने मंजूर केलेला अर्थसंकल्प काही दिवसांपूर्वीच प्रशासनाकडे आला आहे. उत्पन्न आणि खर्च यांचा तुलनात्मक अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.
- दिलीप ढोले, आयुक्त, मिरा-भाईंदर महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82577 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top