
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार
अंबरनाथ, ता. १७ (बातमीदार) ः राज्यातील महाविकास आघाडीची अडीच वर्षे पार पडली आहेत. ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील, असे दिसत आहे; पण मध्येच काही गडबड झालीच, तर आम्ही पुन्हा सत्तेत येणार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
बदलापूरमध्ये आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून सोनिवली येथे साकारलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण, भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या भूमिपूजन कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री आठवले बोलत होते.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री मंत्री कपिल पाटील, मंत्री रामदास आठवले, आमदार किसन कथोरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार कुमार आयलानी यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी (ता. १६) स्मारकाचे लोकार्पण झाले.
आठवले यांनी आमदार किसन कथोरे यांनी केलेल्या विकास कामांचे कौतुक केले. तसेच डॉ. आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी आणि अन्य कामांसाठी ४० लाख रुपयांचा निधी देत असल्याची घोषणा केली. डॉ. आंबेडकर स्मारक समितीचे सुधाकर जाधव, प्रवीण राऊत, संजय गायकवाड, धनराज गायकवाड, महेश जाधव, सुखदेव गायकवाड, तात्यासाहेब सोनावणे, त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, किरण भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते शहराध्यक्ष शरद तेली यांनी सूत्रसंचालन; तर माजी शहराध्यक्ष संभाजी शिंदे यांनी आभार मानले.
बदलापुरात प्रतिदीक्षाभूमी
नागपूरमध्ये दीक्षाभूमी आहे. बदलापूरमध्ये आमदार किसन कथोरे यांनी प्रतिदीक्षाभूमी साकारली असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. स्मारके बांधण्याबरोबरच डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची जागृती झाली पाहिजे. इंदू मिलमधील स्मारकाच्या जागेसाठी लढा सुरू होता. केंद्राशी चर्चा करून ३,६०० कोटी रुपयांची जागा राज्याला मिळवून दिली. त्या जागी डॉ. आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे राहत आहे. बदलापुरातही डॉ. आंबेडकर यांच्या उंच पुतळ्याचे काम नक्की होणार, असा विश्वास विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी दिला.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82599 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..