
झोपडपट्टीत खुलणार शब्दांचे विचार
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १७ : घरातील एकमहिला शिकली की संपूर्ण घर साक्षर होते, या वचनाला अनुसरून नवी मुंबई महापालिकेने झोपडपट्टीतील अज्ञानरूपी अंधार दूर करण्यासाठी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचनामुळे वैचारिक गुणवत्ता वाढावी, या हेतूने महापालिकेतर्फे शहरातील दहा झोपडपट्टीत ग्रंथालय सुरू केले जाणार आहे. आयुक्त अभिजित बांगर यांच्या संकल्पनेतून ‘झोपडपट्टी तिथे ग्रंथालय’ ही संकल्पना राबवण्यात येत आहे.
महापालिकेच्या समाजविकास विभागामार्फत क्षेत्रातील झोपडपट्टी भागामध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणातून सविस्तर आढावा घेण्यासाठी अभिजित बांगर यांनी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. त्यानुसार झोपडपट्टी तिथे ग्रंथालय ही संकल्पना वेग-वेगळ्या टप्प्यात राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील दहा झोपडपट्टींमध्ये ग्रंथालय सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याठिकाणी स्थापत्य विषयक कामे तसेच बाह्य व अंतर्गत रंगरंगोटीची कामे त्वरित सुरु करण्याचे निर्देश बांगर यांनी प्रशासनाला दिले आहेत. हे करताना ग्रंथालयांमधील वातावरण वाचनासाठी प्रोत्साहित करेल अशाप्रकारचे आकर्षक असावे अशी सूचना बांगर यांची आहे.
जागेच्या आकारमानानुसार प्रत्येक ग्रंथालयाची अंतर्गत रचना व सजावट असावी असे निर्देशित करताना त्या ठिकाणी ग्रंथालय व्यवस्थापनासाठी संगणक व प्रिंटरची व्यवस्था करण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले. प्रत्येक ग्रंथालयाच्या जागांमध्ये स्वच्छ प्रसाधनगृहाची व्यवस्था असावी अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या.
आगामी महिन्याभराच्या कालावधीत निश्चित केलेल्या दहाही ठिकाणांवरील ग्रंथालये सुरु करण्यासाठी आवश्यक कामांच्या प्रक्रिया समांतरपणे राबवाव्यात व प्रत्येक झोपडपट्टी भागातील लोकसंख्येचा विचार करून त्यानुसार नागरिकांना वाचायला आवडतील अशा प्रकारची पुस्तके निवडावीत असेही आयुक्तांनी विशेषत्वाने सूचित केले.
नवी मुंबई महापालिकेची शहरातील विविध भागात १९ ठिकाणी ग्रंथालये असून झोपडपट्टी भागातील नागरिक पुस्तकांपासून वंचित रहायला नकोत. त्यांना घरापासून जवळ आपल्या परिसरातच वाचनासाठी सहजपणे पुस्तके उपलब्ध व्हावीत या विचारातून ‘झोपडपट्टी तिथे ग्रंथालय’ ही अभिनव संकल्पना राबवण्यात येत आहे.
या ठिकाणी सुरू होणार ग्रंथालय
नवी मुंबई महापालिकेतर्फे पहिल्या टप्प्यात इंदिरानगर, हनुमान नगर, तुर्भे स्टोअर, गौतम नगर व पंचशीलनगर, कातकरीपाडा व भीमनगर, नोसिल नाका, रामनगर, इलठणपाडा, रमाबाई आंबेडकर नगर, शिवाजी नगर अशा १० झोपडपट्टी भागांमध्ये जागा निश्चिती करण्यात आली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82609 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..