
उड्डाणपुलासाठी ३९० झाडांवर कुऱ्हाड
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १७ : वाशीतील अरेंजा कॉर्नर ते कोपरी उड्डाणपुलापर्यंत प्रस्तावित उड्डाणपुलासाठी तब्बल ३९० झाडांवर कुऱ्हाड पडणार आहे. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने नुकत्याच याबाबत नागरिकांच्या हरकती व सूचना मागवल्या आहेत; परंतु या हरकती व सूचना मागवणारी जाहिरात न वाचणाऱ्या वर्तमानपत्रात देऊन महापालिका कंत्राटदाराला पोषक वातावरण करीत असल्याचा आरोप पर्यावरणवादी आणि काही राजकीय पक्षांकडून होत आहे.
नवी मुंबईतील पामबीच मार्गावर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रशासनातर्फे काही ठिकाणी उड्डाणपुलांचे नियोजन केले जात आहे. प्रशासनाच्या या नियोजनानुसार पामबीच मार्गावर वाशी येथे अरेंजा कॉर्नर ते कोपरी उड्डाणपुलापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने उड्डाणपूल तयार करण्यात येत आहे. या मार्गावर एपीएमसी मार्केट, शहरी वसाहती, शाळा, किरकोळ बाजारपेठा, मार्बल मार्केट आदी रहदारीची ठिकाणे असल्यामुळे वाहतूक कोंडी नित्याची असते. त्यामुळे या मार्गावर उड्डाणपूल झाल्यास वाहतूक कोंडी फुटून पामबीचहून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांचा वेग वाढेल. तसेच भविष्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाहून ठाणे व मुंबईकडे जाणाऱ्या वाहतूकदारांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा महापालिकेला आहे; परंतु या प्रकल्पाच्या उभारणीत या मार्गावर गेली अनेक वर्षे शहराला प्राणवायू देणारी ३९० मोठी व डेरेदार वृक्षांवर पालिकेला कुऱ्हाड चालवावी लागणार आहे.
प्रशासनाने ही झाडे स्थलांतरित अथवा तोडण्यासाठी नागरिकांची सूचना व हरकतींसाठी वर्तमानपत्रात जाहिरात दिली आहे. त्यानुसार १८ मेपर्यंत हरकती मागवण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र प्रशासनाने दिलेली ही मुदत फसवी असल्याचा आरोप भाजपचे युवा नेते राहुल शिंदे यांनी केला आहे.
मुदतवाढ देण्याची मागणी
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाणार असताना फक्त दोन वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देऊन जनतेची, पर्यावरणवाद्यांची दिशाभूल केली जात आहे. पामबीच मार्गावरची एवढी झाडे एकाच वेळेस नष्ट होणार असल्याची साधी कल्पनाही पर्यावरणप्रेमींना नसल्याने नाराजी उमटत आहे. अशा परिस्थितीत या वृक्षतोडीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.
फक्त ३८४ झाडांचे स्थलांतर करणार
महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने दिलेल्या नोटिशीनुसार, वाशीतील अरेंजा कॉर्नर ते कोपरी उड्डाणपुलापर्यंत एकूण ३९० झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. त्यापैकी ३८४ वृक्षांचे स्थलांतर केले जाणार असून उर्वरित ६ झाडे स्थलांतरित होणारी नसल्यामुळे ती तोडली जाणार आहेत. या सहा वृक्षांमध्ये फिजीलिया, चार बोर आणि एका शेवग्याचा झाडाचा समावेश आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82629 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..