
अमरावती एक्सप्रेसला आता नव्या डब्यांचा साज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : मुंबई-अमरावती-मुंबई धावणाऱ्या एक्स्प्रेसला आता अपघातापासून अधिक संरक्षण देणारे जर्मनीचे लिंक होफमैन बुश कोचेस (एलएचबी) डबे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे आपघातावेळी डबे एकमेकांवर चढण्याची भीती अधिक असते. मात्र एलएचबी डब्यांमुळे हा धोका टळणार आहे. शिवाय जीवितहानी आणि गंभीर दुखपतीपासूनसुद्धा अपघातांमध्ये बचाव करण्यास या डब्यांचा प्रवाशांना फायदा होणार आहे. या डब्यांसह अमरावती एक्स्प्रेस प्रथम १४ जून रोजी अमरावतीवरून, तर १५ जून रोजी मुंबईवरून धावणार आहे.
मध्य रेल्वेने ट्रेन क्रमांक १२१११ आणि १२११२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-अमरावती- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेसचे दोन रेक कायमस्वरूपी एलएचबी डब्यांमध्ये बदलण्याचा निर्णय घेतला आहे. एलएचबी कोचसह सुधारित संरचना असलेली ट्रेन धावणार आहे. सध्या या एक्स्प्रेसला पारंपरिक रेल्वेचे आईसीएफ कोच लावण्यात आले आहेत. जे डबे इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी पेरामबूर, चेन्नई येथे तयार करण्यात आले आहेत. मात्र एलएचबी कोच जर्मनीतील लिंक होफमॅन बुश कोच (एलएचबी) अंतर्गत तयार करण्यात आले आहे. सध्या या डब्यांची निर्मिती भारतातसुद्धा केली जात आहे.
...
एलएचबी कोच स्टेनलेस स्टीलचे
आईसीएफ कोच स्टीलने तयार केलेले असतात, त्यामुळे या डब्यांचे वजन जास्त असते. मात्र एलएचबी कोच स्टेनलेस स्टीलने तयार केलेले असल्याने हे डबे हलके असतात. आईसीएफ डब्यांच्या तुलनेत सुमारे १० टक्क्यांनी एलएचबी डब्यांचे वजन कमी असते. त्यामुळे अनेक दृष्टींने एलएचबी डबे प्रवाशांसाठी सुरक्षित असल्याने आता मुंबई-अमरावती-मुंबई प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी वाढणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
...
सुधारित संरचना
एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, दोन द्वितीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित, आठ शयनयान, तीन सामान्य द्वितीय श्रेणी, सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन.
...
जुनी संरचना
एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, दोन द्वितीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित, नऊ शयनयान, चार द्वितीय आसन श्रेणी, दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह लगेज/गार्ड्स ब्रेक व्हॅन.
...
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82650 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..