
दिवसाढवळ्या डोंबिवलीत ज्वेलर्सवर चाकूने हल्ला
डोंबिवली : आगरकर रस्त्यावरील मन्ना गोल्ड ज्वेलर्स मालकावर एका अज्ञात हल्लेखोराने चाकूने हल्ला केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. यामध्ये व्यापारी मन्ना हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सीसी टीव्हीमध्ये कैद झाली असून मारेकऱ्याने चेहरा झाकलेला असल्याने मारेकऱ्याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान आहे. दुकानातील एकही वस्तू चोरीला न गेल्याने पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
डोंबिवली पूर्वेला आगरकर रस्ता परिसरात तारकनाथ मन्ना (५४) हे राहतात. याच रस्त्यावर त्यांचे मन्ना गोल्ड ज्वेलर्सचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी ते आपल्या दुकानात बसले होते. पावणे बाराच्या सुमारास त्यांच्या दुकानात एक व्यक्ती शिरली. त्याने आपला चेहरा पूर्ण झाकला होता. क्षणात त्याने मन्ना यांच्या शर्टाची कॉलर पकडत त्यांना चाकूचा धाक दाखवित धमकाविले. मन्ना यांनी आवाज करण्याचा प्रयत्न करताच चूप बैठो असे सांगत त्यांच्या छातीवर व पोटावर चाकूने वार केले. वार केल्यानंतर मारेकऱ्याने दुकानातून पळ काढला. आजूबाजूच्या नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी लागलीच याची माहिती रामनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मन्ना यांना तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांचा धाकच नाही.
कल्याण-डोंबिवलीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. दिवसाढवळ्या हातात चाकू, तलवारी नाचवत व्यापारी, बांधकाम व्यावसायिक यांना धमकाविले जात असल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी भाजपचे कार्यकर्ता मनोज कटके यांच्यावरही त्यांच्या दुकानात अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला केला होता. हे आरोपी अद्यापही पकडले गेले नाहीत. गुन्हेगारीच्या वाढत्या घटना पाहता पोलिसांचा धाक राहिला नसल्याची चर्चा आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82681 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..