
पोलादपूर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीचा कारभा २१ ग्रामसेवकांवर
पोलादपूर : तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीचा कारभार २१ ग्रामसेवक आपल्या खांद्यावर घेऊन हाकत आहेत. त्यातच सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या कापडे ग्रामपंचायतीला २०२० पासून ग्रामसेवक नाही, तर २००४ पासून बोरावळेचा कारभार इतर ग्रामसेवक याच्याकडे अतिरिक्त दिला आहे. असे असताना जिल्हा निवड मंडळाकडून पोलादपूर तालुक्यातील ग्रामसेवकांच्या विविध प्रश्नांवर लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येत आहे . ग्रामसेवक हा महाराष्ट्रात ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करत असतो. ग्रामसेवकाची जिल्हा निवड मंडळातर्फे केली जाते. पोलादपूर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले तेव्हा इतर तालुक्यांप्रमाणे येथेही सकारात्मक बदल घडतील, अशी आशा ग्रामस्थांना होती.
मात्र, ती काही प्रमाणात फोल ठरली आहे. तालुका मागे पडत चालल्याने अनेक तरुणांनी विकसित शहराकडे कूच केली आहे. गटविकास अधिकारी धनंजय जगताप यांच्याशी विचारणा केली असता तालुक्यात २९ पदे मंजूर असताना २१ पदे भरली गेली आहेत. आठ ग्रामसेवक पदे रिक्त आहेत. पोलादपूर तालुक्यात ४२ ग्रामपंचायत असून, सद्यस्थिती २१ ग्रामसेवक कार्यरत आहे. जिल्हा निवड मंडळातर्फे नव्याने भरती केली जात नाही. अनेक ग्रामसेवकांना दोन ते तीन ग्रामपंचायतींचा कारभार बघावा लागत आहे. रिक्त पदामुळे ग्रामपंचायतींमधील अनेक कामे संथगतीने होत आहेत. यामध्ये करवसुली करणे. वसुलीतून गावविकासाची कामे करणे, पाणीपुरवठा, साफसफाई, दिवा बत्ती, इत्यादी कामांचा समावेश आहे. तर सरकारच्या विविध योजना राबवताना ग्रामसेवकाचे कसब पणाला लावावे लागत आहे. ग्रामसेवकांची होणारी कसरत पाहून रिक्त पदे तातडीने भरावी आणि कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
या ग्रामपंचायतींना ग्रामसेवकांची प्रतीक्षा
तालुक्यातील २६ ऑक्टोबर २००४ पासून बोरावळे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पद रिक्त आहे. गेली १८ वर्षे या ग्रामपंचायतीचा कारभार इतर ग्रामसेवकांकडे देण्यात आला आहे. तर ३१ जुलै २०१७ पासून ग्रामपंचायत ओंबली व चांभारगणी, २४ मे २०१९ पासून मोरगिरी, ३१ मे २०१९ पासून पार्ले, १९ जून २०१९ पासून कोतवाल बु, २ सप्टेंबर २०१९ पासून बोरघर तर ३० जून २०२० पासून कापडे बु या आठ ग्रामपंचायत मुद्दे ग्रामसेवकांची पदे रिक्त असल्याने या गावातील गाडा इतर ग्रामसेवकांना हाकावा लागत आहे. त्यातच शहरापासून ग्रामपंचायतीचे अंतर कमीतकमी १० ते ३० किमीपर्यंत असल्याने काही ग्रामसेवकांना कामे करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82709 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..