
पावसाळ्यानंतर नवी मुंबई महापालिकेची निवडणूक?
Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) election 2022
नवी मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर ओबीसी आरक्षणाशिवाय होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यात झाल्यास प्रशासनासमोर मोठ्या अडचणी येण्याची शक्यता आहे. नवी मुंबईत दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून सखल भागात पाणी साठण्याच्या ठिकाणांची मोठी संख्या आहे. पावसामुळे पूर, दरड कोसळणे, वादळ येणे आदी नैसर्गिक आपत्ती उद्भवण्याची शक्यता असल्याने हजारो मतदार वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे.
कोविडमुळे नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका गेले दोन वर्षे लांबणीवर पडल्या आहेत. महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकाच्या नेतृत्वाखाली कारभार हाकला जात आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य निवडणूक आयोगाला येत्या काळात निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. मात्र पावसाळ्यात निवडणुका झाल्यास प्रशासनासोबतच सर्वसामान्य मतदारांसाठी अडचणींच्या ठरणार आहेत. हे लक्षात घेत न्यायालयाने कमी पाऊस असणाऱ्या ठिकाणी निवडणुका घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र नवी मुंबई हा भाग कोकणपट्ट्यात येणारा परिसर आहे. अरबी समुद्र जवळ असल्याने या पट्ट्यात अनेकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन मुसळधार पाऊस पडतो. तसेच पावसाच्या सरासरीपेक्षा ज्यादा पर्जन्यमान होत आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या या वर्षीच्या होणाऱ्या निवडणुकीत २०११ च्या जनगणनेनुसार मतदारसंख्या गृहीत धरण्यात येणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी सरासरी ८ लाख ४० हजारांपर्यंतची मतदारसंख्या गृहीत धरली जात आहे. गतवर्षी निवडणुकांमध्ये ५०० पेक्षा जास्त केंद्र हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले होते.
पाणी साठल्यास मतदार वंचित राहण्याची भीती
नवी मुंबईत सर्वाधिक मतदार प्रभाग ऐरोली मतदारसंघात आहेत. दिघा, इलठाण पाडा, चिंचपाडा, ऐरोली हे सर्वाधिक मतदारांची घनता असणारे प्रभाग आहेत. तसेच याच प्रभागांमध्ये पाणी साठण्याची ठिकाणे असल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन भागात झाली आहे. त्यामुळे ऐन मतदानाच्या दिवशी पाऊस झाल्यास या भागातील मतदार पाणी साठल्यामुळे वंचित राहण्याची परिस्थिती उद्भवू शकते, असा अंदाज आपत्ती व्यवस्थानातील अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.
चार वर्षांतील पर्जन्यमान (मिमीमध्ये)
२०२१ डिसेंबरपर्यंत - ३४४५.१८
२०२० डिसेंबरपर्यंत - ३५५३.२०
२०१९ नोव्हेंबरपर्यंत - ४६५५.९२
२०१८ ऑक्टोबरपर्यंत - २६३६.८७
पूरसदृश्य ठिकाणे
बेलापूरमध्ये ११ ठिकाणी, नेरूळमध्ये ९ ठिकाणी, वाशीमध्ये १२ ठिकाणी, तुर्भेमध्ये १५ ठिकाणी, कोपरखैरणेमध्ये ९ ठिकाणी, घणसोलीमध्ये १५ ठिकाणी, ऐरोलीत ४ ठिकाणी - टी जंक्शन, अंडरपास रेल्वेस्थानक, ऐरोली-मुलुंड रस्त्याच्या पुलाखाली, सेक्टर ३ आणि सेक्टर १० चा पूल, दिघ्यात २ ठिकाणी - बिंदुमाधव नगर प्रभाग क्रमांक ३ आणि विष्णू नगर येथील डोंगर उतारावरील भाग
दरड कोसळणारी ठिकाणे
नवी मुंबई शहरात १३ ठिकाणे हे दरडप्रवण भाग आहेत. हा बहुतांश झोपडपट्टीबहुल भाग आहे. पावसाळ्यात या भागातील रहिवाशांना अनेकदा स्थलांतरित व्हावे लागते. त्यामुळे पावसाळ्यात निवडणुका झाल्यास त्याचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82742 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..