
टँकर उलटल्याने डिझेल रस्त्यावर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ ः दुभाजकाला धडक देत रस्त्याच्या मधोमध उलटलेल्या टँकरचा डिझेल टॅंक फुटल्याची घटना बुधवारी (ता. १८) पहाटे घोडबंदर रोडवरील पातलीपाडा ब्रिजजवळ घडली. टॅंक फुटल्यामुळे डिझेलसह गाडीतील तेल रस्त्यावर सांडले होते. या घटनेने सुमारे तीन तासांसाठी घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. उलटलेल्या टँकरमध्ये दहा टन केमिकल होते. चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अविनाश सावंत यांनी दिली.
दिलीप पाटील यांच्या मालकीचा केमिकल टँकर चालक दीपक यादव हे गुजरात अंकलेश्वर येथून रत्नागिरी येथील एमआयडीसीकडे घेऊन येत होते. मुंबई-गुजरात महामार्गावरील घोडबंदर रोडने ठाण्याच्या दिशेने जाताना पातलीपाडा ब्रिजजवळ आल्यावर चालक यादव यांचा टँकरवरील ताबा सुटला. यामुळे रस्त्यावरील दुभाजकावर आदळून टँकर रस्त्याच्या मधोमध उलटला. यावेळी टँकरमधील डिझेल टॅंक फुटला आणि त्यामधील डिझेल रस्त्यावर सांडले. तसेच गाडीतील तेल ही रस्त्यावर सांडले. घटनेची माहिती मिळताच कासारवडवली वाहतूक पोलिस, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर टँकर रस्त्याच्या एका बाजूला करण्याचे तसेच सांडलेल्या डिझेल आणि तेलावर माती पसरवण्याबरोबर पाण्याचा मारा करण्याचे काम हाती घेण्यात आले. या वेळी, दोन हायड्रा क्रेनच्या साह्याने टँकर उचलून बाजूला करण्यात आला. त्यानंतर घोडबंदर रोडवरील वाहतूक पूर्वपदावर आली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82761 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..