
पालघरमध्ये भूजल पातळी समाधानकारक
सफाळे, ता.१८ (बातमीदार) ः यंदाच्या हंगामात समाधानकारक पाऊस झाला. तसेच नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पालघर जिल्ह्यात भूजल पातळी समाधानकारक असल्याचे भूजल सर्वेक्षणातून समोर आले आहे. तरीसुद्धा सर्वेक्षणाची व्यापकता वाढवण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यातील मोखाडा, जव्हारसारख्या ग्रामीण भागात पाणीटंचाई भासत आहे. तरीदेखील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत जिल्ह्यातील ५४ विहिरींचे पाण्याच्या पातळीसाठी नियमितपणे सर्वेक्षण केले जात आहे. या विहिरींचा ऑक्टोबर, जानेवारी, मार्च व मे महिन्यात पाण्याच्या पातळीसाठी अभ्यास केला जात आहे. मार्च अखेरीस करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून करवाळे व सातिवली वगळता सर्व नमुना विहिरींमधील पाण्याची पातळी पूर्वीच्या सरासरीपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत जिल्ह्यातील ५४ विहिरींचा अभ्यास केला जात असून ०.२५ मीटर ते ०.५५ मीटर इतकी भूजल पातळी अधिक असल्याचे दिसून आले आहे.
भूजल पातळीचा नियमित अभ्यास करण्यासाठी स्थानिक पातळीवर काम सोपविण्यात आले आहे. तरी पाण्याची पातळी अभ्यासण्याचे काम ग्रामपंचायत कर्मचारी करीत आहेत. बिगर पावसाळी काळात त्रैमासिक पातळी नोंदवण्याचे काम भूजल सर्वेक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील भूजल पातळीचा खरा अंदाज मिळण्यासाठी या उपक्रमाची व्यापकता वाढविणे आवश्यक आहे. जलस्वराज्य-२ योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील निवडलेल्या ९०७ विहिरींतील पाण्याची पातळी घेण्याचे काम ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी करत आहेत. त्याकरिता त्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून पातळीचे निरीक्षण व नोंदी नोंदवहीमध्ये ठेवण्यात येत आहेत. यापैकी अधिकांश विहिरींची पातळी प्रथमच घेतली जात असून काही वर्षांची माहिती संकलित झाल्यानंतर ग्राम पातळीवरील पाण्याच्या पातळीमध्ये होणाऱ्या फरकाचा अधिक बारकाईने अभ्यास करता येईल, असे भूजल सर्वेक्षण व विकास विभागातर्फे सांगण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82767 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..