
मुंबईच्या प्रभाग रचनेवरून कॉंग्रेस-शिवसेनेत जुंपली
मुंबई, ता. १८ : राज्य निवडणूक आयुक्तांनी गेल्याच आठवड्यात मुंबई महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब केले. नव्या रचनेनुसार महापालिकेतील सदस्य संख्या २३६ पर्यंत वाढली आहे; पण नव्या प्रभाग रचनेवरून कॉंग्रेसने नाराजी व्यक्त केली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रभाग रचनेचा फायदा महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनाही व्हायला हवा, असा पवित्रा घेतला. वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याचेही संकेत पटोले यांनी दिले. दरम्यान, मुंबईकरांचे नुकसान करायचे असल्यास खुशाल न्यायालयात जा, अशी प्रतिक्रिया शिवसेनेकडून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली.
मुंबई महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेचा फायदा ‘मविआ’तील तिन्ही पक्षांना व्हावा, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती. त्यावेळी त्यांनी प्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारीही दर्शवली आहे. नव्या प्रभाग रचनेचा सर्वाधिक फायदा शिवसेनेला होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच कॉंग्रेसने आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. कॉंग्रेसच्या नाराजीवर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही शिवसेनेकडून प्रतिक्रिया दिली. मुंबईकरांचे नुकसान करायचे असेल तर खुशाल न्यायालयात जा, अशी प्रतिक्रिया पेडणेकर यांनी दिली; तर कॉंग्रेसकडून येत्या काही दिवसांमध्ये हा मुद्दा लावून धरण्याचे संकेत आहेत.
---
भाजपही न्यायालयात?
मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेबाबत दहा हजारांहून अधिक सूचना आणि हरकती आल्या आहेत. भाजपच्या नगरसेवकांनीही आपल्या सूचना आणि हरकती या निमित्ताने मांडलेल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या हद्दी, रेल्वे ब्रीज, नाल्याच्या सीमाही या प्रभाग रचनेच्या निमित्ताने पाळण्यात आलेल्या नाहीत. अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅक ओलांडूनही प्रभाग एकत्र करण्यात आले आहेत. महापालिकेतील सदस्यसंख्या २२७ वरून २३६ करताना कोणत्या निकषांचा आधार घेतला, हे स्पष्ट करण्यात आले नाही. राज्य निवडणूक आयोगाने सूचना आणि हरकतींचा कोणताही विचार न करता केवळ सत्ताधाऱ्यांच्या सोयीची प्रभागरचना मान्य केल्याचे मत भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी मांडले. त्यामुळे प्रभाग रचनेच्या मुद्द्यावर न्यायालयात धाव घेण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82790 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..