
नवी मुंबई महापालिकेच्या उड्डाणपूलाला विरोध
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १८ : पामबीच रोडवरील वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशाने वाशीतील महात्मा फुले सभागृह चौक ते कोपरी गावापर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे; पण या उड्डाणपुलाला विरोध होत आहे. या रस्त्यावरील मॉल आणि मंत्र्यांमध्ये झालेल्या तडजोडीसाठी हा उड्डाणपूल उभारण्यात येत असल्याची चर्चा शहरात दबक्या आवाजात सुरू आहे. विशेष म्हणजे या उड्डाणपुलाला मविआमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी विरोध केला आहे. त्यांनी यावर पुनर्विचार करण्याचे निवेदन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दिले आहे.
पामबीच मार्गावरील वाहनांची दिवसेंदिवस वाढत चाललेली संख्या पाहता वाशीमध्ये महात्मा फुले चौक ते कोपरी गावापर्यंत उड्डाणपूल उभारण्याचे काम नवी मुंबई महापालिकेतर्फे हाती घेण्यात येणार आहे. या उड्डाणपुलावर तब्बल ४०५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. महापालिकेने या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवून एका कंपनीला कार्यादेशही दिला आहे; परंतु त्यासाठी या मार्गावरील ३९० झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे.
मुळात हा उड्डाणपूल ज्या मार्गिकेवर होत आहे, त्या मार्गिकेच्या शेजारी असणाऱ्या सतरा प्लाझा आणि इतर मॉलचे प्रवेशद्वार पामबीच मार्गाच्या दिशेने नसून वाशी बाजार समितीच्या दाणा मार्केटच्या दिशेने आहेत. तरीही मॉल व्यवस्थापनाकडून बेकायदेशीररित्या मॉलमधील दुकानांचे प्रवेश पामबीच रस्त्याच्या दिशेने ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गावर रोज वाहतूक कोंडी होत असे. नवी मुंबईचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मॉल व्यवस्थापनांनी नियमांचा भंग केल्याप्रकरणी भोगवटा प्रमाणपत्र रद्द का करू नये, अशी नोटीसही संबंधितांना बजावली होती. त्यामुळे या मार्गावरील बहुतांश विकसकांचे धाबे दणाणले होते. दरम्यानच्या काळात त्यांनी नगरविकास खात्याकडून स्थगिती आदेश मिळवला. तसेच मुंढे यांची बदली झाल्याने करवाईही टळली; परंतु त्यांच्यानंतर आलेले आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांनीही मुंढेंची री ओढत या मार्गावरील दुकानांचे आणि मॉलचे बेकादेशीर प्रवेश रोखण्यासाठी रस्त्याच्या कडेला मोठ्या भिंती उभारण्याचा प्रस्ताव आणला होता. मात्र, दोघांच्याही बदल्या झाल्याने या मार्गावरील विकसकांना दिलासा मिळाला होता. महापालिकेला जर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करायची असेल तर याआधीच्या आयुक्तांकडून करण्यात येत असणारे भिंत घालणारे अथवा दुकानांचे प्रवेश बंद करण्याची कारवाई करावी, अशी विनंती दिव्या गायकवाड यांनी अभिजीत बांगर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
---
विद्यमान आयुक्त अभिजीत बांगर यांनी भिंत घालणे आणि पामबीच मार्गावरील मॉल व दुकानांचे प्रवेश बंद केल्यास महापालिकेची ४०५ कोटी रुपयांची बचत होईल, असे गायकवाड यांनी सांगितले. गायकवाड यांच्या या पत्राने महापालिका आणि राजकीय वर्तुळात जोरदार खलबते सुरू आहेत. या पत्रानंतर बांगर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82794 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..