बचत गटातील महिलांना अखेर वेतन मिळाले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बचत गटातील महिलांना अखेर वेतन मिळाले
बचत गटातील महिलांना अखेर वेतन मिळाले

बचत गटातील महिलांना अखेर वेतन मिळाले

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. १९ (वार्ताहर) ः उन्हातान्हात घरोघरी टॅक्स पावत्या वितरित केल्यावरही गेल्या आठ महिन्यांपासून पगार थकवल्याने संतप्त झालेल्या बचत गटाच्या महिलांनी काँग्रेसच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर वेतन मिळाले आहे. महिलांची पगारासाठीची आठ महिन्यांपासूनची प्रतीक्षा संपल्याने काँग्रेसचे आभार मानले आहेत.
मालमत्ता कर विभागाच्या पावत्या घरोघरी पोहचवण्याचे काम बचत गटाच्या दोनशे महिलांना सोपवण्यात आले आहे. त्यासाठी त्यांना प्रत्येक पावतीमागे अठरा रुपये देण्यात येतात. पूर्वी पालिकेच्या वतीने या महिलांना पगार दिला जात होता. मात्र आता हे कंत्राट कोलब्रो कंपनीला देण्यात आले आहे. कंपनीने याच अनुभवी महिलांना कर पावती वितरित करण्याचे काम दिले आहे. मात्र उन्हातान्हात, पावसात पावत्या वितरित करण्याचे काम करूनही गेल्या आठ महिन्यांपासून महिलांचा पगार कंपनीने थकवला होता. त्यामुळे महिलांनी २५ एप्रिल रोजी कंपनीच्या कार्यालयावर धडक देऊन कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयाला टाळे ठोकले होते.
काँग्रेसच्या नगरसेविका आणि गटनेत्या अंजली साळवे यांनी बचत गटाच्या महिलांना कर पावत्या वितरित करण्याचे काम मिळण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा केला होता. मात्र, या महिलांचा पगार थकवण्यात आल्याने अंजली साळवे यांनी पालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधले होते. त्यावर डॉ. दयानिधी यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्या होत्या; तर दुसरीकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी या महिलांना त्यांचा पगार तात्काळ देण्यात यावा, अन्यथा या दोनशे महिलांसोबत पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात येणार, असा इशारा दिला होता.