मळेगवा येथील शेतकऱ्याला ‘जिजाऊ’चा मदतीचा हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मळेगवा येथील शेतकऱ्याला ‘जिजाऊ’चा मदतीचा हात
मळेगवा येथील शेतकऱ्याला ‘जिजाऊ’चा मदतीचा हात

मळेगवा येथील शेतकऱ्याला ‘जिजाऊ’चा मदतीचा हात

sakal_logo
By

खर्डी, ता. १९ (बातमीदार) ः शहापूर तालुक्यातील मळेगाव (नारायणगाव) येथील शेतकरी नामदेव शिर्के यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीव्यवसायावर अवलंबून आहे. पावसाळा संपला की नोव्हेंबरपासून पाण्याचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे त्यांना शेती करण्यास अडचण येत होती. त्यामुळे जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीलेश सांबरे यांनी स्वखर्चाने नामदेव शिर्के यांना शेतात बोअरवेल मारून पाणी उपलब्ध करून दिले. यामुळे या प्रगतशील शेतकऱ्याला आता बारमाही शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करता येणार असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.
नामदेव शिर्के यांनी अर्ध्या एकरात हळदीचे पीक घेतले होते. तसेच उर्वरित शेतजमिनीत रताळे, सुरण, वांगी, चवळी, झेंडू आदी पिके घेतली होती; परंतु गेल्या काही वर्षांपासून पाण्याच्या अभावामुळे शेती करण्यास अडचण येत असल्याने ते हतबल झाले होते व त्यांची आर्थिक परिस्थितीसुद्धा नाजूक असल्याने पाण्याची कुठलीही पर्यायी व्यवस्था करता येत नव्हती. ही अडचण लक्षात घेऊन जिजाऊ संस्थेचे संस्थापक नीलेश सांबरे यांनी भेट देऊन सर्व समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी जिजाऊ संघटनेचे अविनाश चंदे, तेजस पडवळ, छगन शिर्के, संस्थेचे समन्वयक कमलेश वेखंडे, हरेश मोगरे उपस्थित होते.

कोकण समृद्ध करणे हेच जिजाऊ संस्थेचे ध्येय व स्वप्न आहे. त्यामुळे शेतकरी सक्षम झाले पाहिजेत व त्यांनी दर्जेदार शेती करावी, यासाठी शेतकरी बांधवांच्या अडचणी दूर करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.
- नीलेश सांबरे, संस्थापक, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था

शेताच्या बांधावर येऊन अनेकांनी पाहणी केली. विविध आश्वासने दिली; मात्र दिलेला शब्द पाळणारे व्यक्ती म्हणजे नीलेश सांबरे. त्यांना अभिप्रेत असणारी आदर्श शेती नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन. जिजाऊ संस्था व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.
- नामदेव शिर्के, उपक्रमशील शेतकरी, मळेगाव