
वालधुनी प्रदुषित करणाऱ्यांवर कारवाई होणार
अंबरनाथ, ता. १९ (बातमीदार) ः वालधुनी नदीमध्ये रासायनिक पाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी पर्यावरणप्रेमींनी आंदोलनाचा इशारा दिला. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. नदी प्रदूषित करणाऱ्या कंपन्यांवर छापा टाकून कारवाईचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
अंबरनाथच्या डोंगराळ भागातून उगम पावणाऱ्या वालधुनी नदीची स्वच्छता आणि संवर्धन मोहीम नगरपालिका प्रशासनाने १४ फेब्रुवारी ते ५ जूनपर्यंत हाती घेतली आहे. या मोहिमेत सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी नागरिक, शैक्षणिक संस्था यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. काकोळे, फणशीपाडा परिसरात नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आहे. मात्र अंबरनाथच्या आनंदनगर औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कारखान्यांतून नदीपात्रात सोडणारे पाणी थांबवले जात नसल्याने नदी संवर्धन कामात मोठा अडथळा ठरत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी आणि पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रदूषण करणाऱ्यांचा बंदोबस्त होत नसल्याचे वालधुनी जलबिरादरी, मातोश्री ट्रस्ट आदींच्या वतीने सांगण्यात आले.
पोलिसांची मध्यस्थी यशस्वी
प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने नदी स्वच्छतेच्या कार्यात सहभागी असणाऱ्या संस्था, ग्रामस्थ आदींनी मंगळवारी (ता.१७) उपोषण करण्याचा निर्धार केला होता. मात्र, शिवाजीनगर पोलिसांनी आंदोलनाचा इशारा देणाऱ्यांशी चर्चा करून एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगरपालिका प्रशासन यांच्यामध्ये एमआयडीसी कार्यालयात चर्चा केली. त्यावेळी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईसाठी संयुक्त मोहिमा अचानक आयोजित केल्या जातील. त्याचप्रमाणे शहरात उभारण्यात आलेल्या चौक्यांमधून वाहनांची तपासणीही केली जाईल, असे आश्वासन बैठकीत आंदोलकांना देण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82807 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..