
उड्डाणपुलाच्या कामाला गती
वसई, ता. १९ (बातमीदार) ः नायगाव पूर्वेकडील जूचंद्र येथे असलेल्या रेल्वे फाटकामुळे दररोज नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे अत्यावश्यक सेवांना फटका बसत असतो. त्यामुळे रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या जूचंद्र-चंद्रपाडा या नव्या उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच पर्यायी मार्गाची व्यवस्था होणार आहे. शिवाय मुंबई अहमदाबाद-महामार्ग प्रवासही सुकर होणार आहे.
एमएमआरडीने उभारलेल्या नायगाव पूर्व पश्चिम उड्डाणपूल नागरिकांना रहदारीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीला फायदा होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानेही जूचंद्र-चंद्रपाडा उड्डाणपुलाला ऑक्टोबर २०२१ रोजी मान्यता दिली. त्यानंतर कामाला सुरुवात झाली; परंतु कोरोनाकाळात काम थांबले होते. मात्र आता या कामाला गती मिळत आहे. या कामासाठी ८६ कोटी रुपये खर्च होणार आहेत. चंद्रपाडा व जूचंद्र गाव अशा दोन्ही ठिकाणी काम सुरू आहे.
नायगाव पूर्वेतील जूचंद्र रेल्वेफाटक (एलसी ९) हे मालवाहू गाड्या, पॅसेंजर, शटल ट्रेन अशी विविध रेल्वे वाहतूक सुरू असते. त्यामुळे सिग्नल दिल्यावर फाटक वारंवार बंद होते. त्यामुळे येथे नेहमीच वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागून कोंडीला सामोरे जावे लागत असते. शाळा, कॉलेज, दवाखाने, रुग्णालयाकडे जाणाऱ्या या मार्गाला अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पुलाच्या उभारणीसाठी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा करण्यात आला होता. येथील माजी सभापती कन्हैय्या भोईर यांनी विभागाकडे पत्रव्यवहार केला.
जूचंद्र चंद्रपाडा उड्डाणपुलासाठी सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला. काम वेगाने सुरू आहे. येथील रेल्वे फाटकामुळे वाहनांची अडचण उड्डाणपुलामुळे दूर होऊन वाहतूक सुरळीत होईल.
- कन्हैया भोईर, माजी सभापती, महापालिका
नायगाव पूर्वेकडे नागरिकांच्या सुविधेसाठी उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. जूचंद्र, रेल्वे फाटक व चंद्रपाडा असा उड्डाणपुलाचा मार्ग असणार आहे. वाहतुकीसाठी पर्याय उपलब्ध होणार आहे.
- प्रशांत ठाकरे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग