
वसई विरार महानगरपालिकेने अद्यावत नाट्यगृह उभारावे.
वसई-विरार महापालिकेने अद्ययावत नाट्यगृह उभारावे
अशोक हांडे
विरार, ता. (बातमीदार) ः
वसई तालुका ही एक सांस्कृतिक नगरी असून या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाला मोठा रसिक वर्ग मिळत असतो. हे लक्षात घेऊन वसई-विरार महापालिकेने आपल्या क्षेत्रात मोठे सुसज्ज असे नाट्यगृह उभारावे. ज्यामुळे येथील रसिकांना चांगल्या नाटकांची आणि दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी मिळू शकेल, असे मत प्रसिद्ध कलाकार अशोक हांडे यांनी वसई विजय दिनानिमित्य आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. यावेळी हांडे यांचा पालिकेतर्फे आयुक्त अनिलकुमार पवार, खासदार राजेंद्र गावित, माजी महापौर राजीव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
परकीय पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्तता देऊन इतिहास प्रसिद्ध अशा नरवीर चिमाजी आप्पाच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या २८४ व्या वसई विजय दिनानिमित्त वसईत अनेक कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये वज्रेश्वरी देवी मंदिरापासून वसई किल्ल्यापर्यंत मशाल यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेत पारंपरिक वेषभूषेतील नागरिक उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. नरवीर चिमाजी आप्पा यांना यावेळी मानवंदना देण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी अशोक हांडे यांचा लतादीदींना श्रद्धांजली अर्पण करणारा ‘अमृत लता‘ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात अनेकांचे सत्कार करण्यात आले. त्यावेळी अशोक हांडे यांनी केलेल्या मागणीबाबत बोलताना माजी महापौर राजीव पाटील यांनी सांगितले, पालिका क्षेत्रात एक हजार प्रेक्षक बसतील एवढे मोठे नाट्यगृह उभारण्याची योजना आकाराला येत आहे. या नाट्यगृहाला आपल्यासारख्या कलाकारांनी मदत करावी, असे आवाहन राजीव पाटील यांनी केले. कार्यक्रमाला माजी आमदार डॉमनिक घोन्साल्विस, ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बबनशेठ नाईक, यशवंत पाटील, माजी महापौर नारायण मानकर, प्रवीण शेट्टी, माजी उपमहापौर प्रकाश रॉड्रिक्स, संदेश जाधव, प्रकाश वनमाळी व इतर मान्यवर उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82830 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..