
बंधारा पाड्यातील आदिवासी पितात डबक्यातील पाणी
वाडा, ता. १९ (बातमीदार) ः तालुक्यातील पालसई ग्रामपंचायत हद्दीतील बंधारा पाड्यातील आदिवासी बांधव आजही डबक्यातील अशुद्ध पाणी पीत असल्याचे समोर आले आहे. या पाड्याच्या शेजारीच भलेमोठे धरण आहे. मात्र त्या पाण्याचा त्यांना काहीही फायदा होत नाही. डबक्यातील अशुद्ध पाण्यामुळे आदिवासी बांधवांच्या आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
वाडा तालुक्याला पंचनद्यांचे वरदान लाभले आहे. तानसा, वैतरणा, पिंजाळ, देहर्जे व गारगावी अशा पाच बारमाही वाहत असलेल्या नद्या या तालुक्यात आहेत. मात्र, पाण्याचे नियोजन नसल्याने येथील नागरिक आजही तहानलेलेच आहेत. तालुक्यातील पालसई ग्रामपंचायतीच्या हद्दीत असनस हे गाव आहे. या गावातील काही नागरिक आपल्या शेतावर राहत असून बंधारा पाडा येथे गेल्या आठ ते दहा वर्षांपासून नागरिक राहतात. मात्र त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी विहीर किंवा कूपनलिका नसल्याने एका शेतातील डबक्यातील पाणी आदिवासी बांधव बारा महिने पीत असतात. या अशुद्ध पाण्यामुळे पावसाळ्यात त्यांना गॅस्ट्रोसारखे आजार नेहमीच होत असल्याचे वैशाली मानकर या महिलेने सांगितले.
विंधन विहिरीची मागणी
ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा मागणी करूनही ग्रामपंचायत प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने आदिवासी बांधवांना आजही डबक्यातील अशुद्ध पाणी प्यावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, आम्हाला विंधन विहीर खोदून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ काशिनाथ मानकर यांनी केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82838 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..