
प्लास्टिक बंदीवर प्रश्नचिन्ह
नवीन पनवेल, ता. १९ (वार्ताहर) : सिडको वसाहतीत पावसाळी गटारे आणि नालेसफाईची कामे जोरात सुरू आहेत. या नाल्यांमध्ये माती आणि इतर टाकाऊ वस्तू आढळून येत आहेत; मात्र कळंबोली वसाहत व स्टील मार्केटमधील गटारांमध्ये चक्क प्लास्टिकच्या पिशव्या, बिअर व दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचे आढळून आले. त्यामुळे प्लास्टिकबंदी राबवूनही कोणताही लाभ होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
२६ जुलै २००५ रोजी आलेल्या महाप्रलयास प्लास्टिकही कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट झाले होते. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने ते नाल्यात जाऊन अडकते. त्यामुळे अनेक ठिकाणी नाल्यांच्या पात्रात पिशव्या साचल्याने पावसाचे पाणी तुंबून ते रस्त्यावर व घरात शिरण्याचे प्रकार घडत असल्याचे समोर आले. त्यामुळे २३ जून २०१८ पासून राज्यात प्लास्टिकबंदी आदेश लागू झाले. त्याला आता जवळपास तीन वर्षे होत आहेत; मात्र त्यानंतरही बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच असल्याचे आढळून आले आहे. मोकळे भूखंड, महामार्ग आणि रस्त्यांच्या कडा, नाले आणि गटारात प्लास्टिक निदर्शनास येत आहे. राज्य सरकारने बंदी आणली असली, तरी आजही अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा वापर दिसून येत आहे. हे प्लास्टिक नाले आणि गटार साचताना दिसत आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून कळंबोलीत मान्सूनपूर्व गटारसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात बिअरच्या बाटल्या सफाईदरम्यान गटारातून बाहेर काढण्यात आल्या. सेक्टर -१४ येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळेच्या मागच्या गेटजवळील गटारामध्ये बाटल्यांचा खच मोठ्या प्रमाणात आढळून आला. अनेक ठिकाणी गटारांची झाकणे उघडी असल्याने त्यात बिअर आणि दारूच्या बाटल्या टाकल्या जातात. इतर वसाहतीतसुद्धा थोड्या-फार फरकाने हीच स्थिती आहे. प्लास्टिकच्या पिशव्या आणि पाण्याच्या बाटल्यासुद्धा गटारातून बाहेर काढल्या जात असल्याने पनवेल परिसरात प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीविषयी साशंकता निर्माण होत आहे.
प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच
मटण, मासळी बाजारामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच आहे. आज हजारो प्लास्टिकच्या काळ्या पिशव्या कचऱ्यात दिसत आहेत. ग्रामीण भागात विल्हेवाट लावण्याची यंत्रणा नसल्यामुळे प्लास्टिक कचरा जाळून टाकला जातो. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे.
नालेसफाईमधून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकसह इतरही वस्तू निघत आहेत. कोरोना काळामध्ये प्लास्टिक बंदीच्या कारवाईवर शिथिलता आली होती; परंतु सध्या प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाया सुरू आहेत. यासाठी स्वच्छता मार्शलही नेमण्यात आले आहेत.
- अरुण कांबळे,
स्वच्छता निरीक्षक, कळंबोली