
चहा व्यवसायात मराठी दबदबा
ठाणे, ता. १९ (बातमीदार) : जगभरात पाण्यानंतर सर्वाधिक प्यायले जाणारे पेय म्हणजे चहा! याच गरमागरम आणि स्वादिष्ट पेयाने अनेक चहाप्रेमींच्या दिवसाची सुरुवात होते. चहा घेतल्याशिवाय अनेकांना ताजेतवाने वाटत नाही, तर चहा घेतल्याने पुढचा दिवस व्यवस्थित सुरू होतो, अशी अनेकांची भावना असते. त्यामुळे दिवसभर चहाच्या टपऱ्या आणि दुकानाबाहेर चहाप्रेमींची रेलचेल असते. ठाणे शहरात सध्याच्या अनेक ब्रँडच्या चहाची सुमारे २०० ते २५० दुकाने आहेत. मुख्यत्वे चहाच्या व्यवसायात अनेक मराठी तरुण व्यावसायिकांनी उडी घेतली असल्याने इतर समाजातील लोकांची मक्तेदारी असणाऱ्या या व्यवसायात आता मराठी व्यावसायिकांचा दबदबा वाढू लागला आहे.
ठाण्यासह आसपासच्या शहरात काही वर्षांपूर्वी चहा व्यवसायामध्ये राजस्थानी, मारवाडी समाजातील लोकांची मक्तेदारी होती. लहान वाटी, काचेचे ग्लास इत्यादीमधून ७ ते ८ रुपयांत मिळणारी कटिंग, तर १५ रुपयांत मिळणाऱ्या चहाला लोकांची पसंती असायची. मात्र हॉटेलिंगचे क्षेत्र विस्तारत असताना शहरी भागात चहाच्या टपऱ्यांची जागा आता लॅव्हिश दुकानांनी घेतली आहे. चांगल्या वातावरणात, स्वच्छ ठिकाणी, परवडणाऱ्या किमतीत मिळणारी फक्कड चहा ही या दुकानांची विशेष बाब आहे.
चहामध्ये विविध स्वाद
ठाणे शहरात पारंपरिक आलं, वेलची, मसाला, गूळ, गवती, इत्यादी प्रकारच्या चहासह कुल्लड चहा, तंदुरी चहा, चॉकलेट चहा, रोझ चहा, पान चहा, केसर इलायची चहा, पहाडी चहा, उकाळा यांसारख्या अनेक प्रकारचे चहा उपलब्ध आहेत. नैसर्गिक चहामध्ये ग्रीन टी, हनी टी, ब्लॅक टी, लेमन टी, पायनॅपल टी असे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे चहाप्रेमींसह कॉफीप्रेमीही चहा पिण्याकडे वळत असून चहाच्या वेगवेगळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी चहा दुकानांकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे. ठाण्यात मिळणाऱ्या विविध चहांची किंमत सुमारे १० रुपयांपासून ते ३० रुपयांपर्यंत आहे.
रोजगार निर्मितीत वाढ
चहाच्या व्यवसायाने अनेकांना रोजगार मिळवून दिला आहे. शहरातील चहाच्या एका दुकानावर मालकासह ८ ते ९ कामगारांना रोजगार प्राप्त होतो. चहाच्या व्यवसायामुळे आजच्या घडीला सुमारे ४० ते ५० मराठी उद्योजक उभे राहिले असून हा व्यवसाय जवळपास ५ ते ५० हजार रोजगार उपलब्ध करून देत आहे.
दैनंदिन जीवनात चहा ही लोकांच्या सवयीचा भाग झाल्याने कुठल्याही ऋतूत चहाचा व्यवसाय तेजीत असतो. दिवसेंदिवस या व्यवसायाचे विस्तारीकरण लक्षात घेऊन अनेक मराठी व्यावसायिक या व्यवसायाकडे वळत आहेत.
- गणेश दारेकर, चहा व्यावसायिक