
घणसोली खाडी किनारी जैविक कचऱ्याचे ढीग
घणसोली, ता. १९ (बातमीदार) : दवाखान्यात वापरण्यात आलेल्या वैद्यकीय जैविक टाकाऊ वस्तूंचा टेम्पोभर साठा घणसोलीतील कोळी बाणा चौकानजीक खाडीकिनारी आढळला आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या खाडीकिनारी मासेमारी करीत जाणाऱ्या मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यात सुया, गोळ्या असल्याने या वस्तू फेकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मच्छीमारांकडून होत आहे.
घणसोली गावातील अनेक मच्छीमार खाडीत मासेमारीसाठी येत असतात. याच खाडीकिनारी बुधवारी (ता. १८) सकाळी मुदत संपलेल्या औषधी गोळ्या आढळून आल्या. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हे कृत्य केले जात असल्याचा संशय मच्छीमारांनी व्यक्त केला. खाडीकिनारी दिवाबत्तीची सोय नसल्यामुळे रात्री मासेमारीसाठी जाताना अंधारातून जावे लागते. अशा वेळी अंधारात पायाखाली दिसत नसल्याने या सुयांमुळे इजादेखील होऊ शकते. यापूर्वीही घणसोली आणि ऐरोली गावातील खाडीकिनारी मोठ्या प्रमाणावर इंजेक्शन आणि औषधांचा साठा आढळला होता. त्यावेळी याच गावातील मच्छीमार बांधवांना इंजेक्शनच्या सुया टोचून जखमा झाल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती घडू नये, यासाठी दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82860 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..