महाराष्ट्राचे शिष्टमंडळ कान चित्रपट महोत्सवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्राचे शिष्टमंडळ कान चित्रपट महोत्सवात
महाराष्ट्राचे शिष्टमंडळ कान चित्रपट महोत्सवात

महाराष्ट्राचे शिष्टमंडळ कान चित्रपट महोत्सवात

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ ः फ्रान्समधील सुप्रसिद्ध ‘कान’ चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे शिष्टमंडळ आज कान येथे पोहोचत आहे. १७ मेपासून सुरू झालेला हा कान चित्रपट महोत्सव येत्या २८ मेपर्यंत सुरू राहणार आहे.

चित्रपट महोत्सवात जाणाऱ्या शिष्टमंडळात सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे महाव्यवस्थपकीय संचालक विवेक भिमनवार, समन्वयक अशोक राणे, मनोज कदम यांचा सहभाग असेल. याशिवाय महोत्सवासाठी निवड झालेल्या ‘कारखानीसांची वारी’, ‘पोटरा’ आणि ‘तिचं शहर होणं’ या मराठी चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक अर्चना बोराडे, मंगेश जोशी, शंकर धोत्रे, समीर थोरात, सिद्धार्थ मिश्रा, रसिका आगाशे याही सहभागी होत आहेत.

जागतिक स्तरावरील चित्रपटाच्या बदलत्या प्रवाहांचा मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्यांना अनुभव घेता यावा; तसेच मराठी चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचावा, या दृष्टीने या शिष्टमंडळात यांचा समावेश केला गेला आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटांना कान फिल्म फेस्टिवलमधील फिल्म मार्केट हे चांगले माध्यम आहे आणि यात सहभागी होण्याची संधी मराठीप्रमाणे हिंदी चित्रपट निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना यानिमित्ताने उपलब्ध होत आहे. या महोत्सवातील इंडिया पॉवेलियनचे उद्घाटन नुकतेच झाले आहे. या पॅव्हेलियनमध्ये चित्रपट महोत्सवाच्या काळात सुरू असणाऱ्या चर्चासत्र आणि परस्पर संवादांच्या उपक्रमात सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख आणि सचिव सौरभ विजय हे सहभागी होतील.

जगभरातील निर्मात्यांना आकर्षित करणार
भारतीय चित्रपटाच्या उद्योगात आणि विशेषतः हिंदी चित्रपटांच्या निर्मितीत महाराष्ट्राचे स्थान अग्रस्थानी आहे. चित्रीकरणासाठीच्या सुविधा मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरीत उपलब्ध आहेत. कान येथील चित्रपट महोत्सवात चित्रपट नगरीतील सुविधा आणि उपलब्ध स्पॉटबद्दल सादरीकरण करण्यात येईल. बॉलीवूड हे जगभरातील चित्रपट निर्मात्यांचे आकर्षणाचे केंद्र आहे. येथील चित्रपट निर्मितीबद्दल त्यांच्या मनात प्रचंड औत्सुक्य आहे. यामुळे सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट महोत्सवात सहभागी होणाऱ्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून जगभरातील निर्मात्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाईल.

चित्रपट उद्योग वाढीस लागेल!
कान चित्रपट महोत्सवातील महाराष्ट्राच्या सहभागामुळे महाराष्ट्रातील चित्रपट उद्योग वाढीस लागण्यासह विशेषतः फ्रान्स आणि महाराष्ट्र यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील आणि त्यांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास अमित देशमुख यांनी व्यक्त केला आहे.