हिंदू नेता बनायचंय..., तर माफी मागा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदू नेता बनायचंय..., तर माफी मागा!
हिंदू नेता बनायचंय..., तर माफी मागा!

हिंदू नेता बनायचंय..., तर माफी मागा!

sakal_logo
By

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५ जूनच्या अयोद्धा दौऱ्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील भाजपचे बाहुबली खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोद्धा दौऱ्याला टोकाचा विरोध दर्शवला आहे. उत्तर प्रदेशवासीयांची राज ठाकरे यांनी माफी मागावी, अन्यथा अयोद्धेत प्रवेश करू देणार नाही, अशा भूमिकेवर ते ठाम आहेत. राज ठाकरेंना रोखण्यासाठी त्यांनी मोठी तयारी केली आहे. या संपूर्ण परिस्थितीवर बृजभूषण सिंह यांच्याशी ‘सकाळ''ने साधलेला संवाद...
- विनोद राऊत

- राज ठाकरेंच्या अयोध्या भेटीला विरोध करण्यामागील तुमची भूमिका काय?
राज ठाकरे हे पहिले व्यक्ती आहेत, ज्यांनी लोकप्रियता मिळवण्यासाठी उत्तर भारतीय, मराठी माणसाचा मुद्दा हाती घेतला. त्यांच्या या आंदोलनामुळे उत्तर भारतीय लोकांना बराच त्रास सहन करावा लागला. २००८ पासून मनसेने उत्तर भारतीय नागरिकांवर हल्ले केले. ६० ते ७० हजार नागरिकांना याची झळ बसली. काही जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण मनसेच्या हल्ल्यात जखमी झाले. त्यांना हे सर्व राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेमुळे सहन करावे लागले. त्यामुळे माझी भूमिका स्पष्ट आहे. राज ठाकरेंना अयोध्येत यायचे असेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटायचे असेल, हिंदू नेता बनायचे असेल, तर तुम्ही आतापर्यंत उत्तर भारतीयांना ज्या जखमा दिल्या; जात, भाषा, प्रांतावरून जो भेदभाव केला, त्या कृत्याबद्दल माफी मागावी लागेल.

- ५ जूनला अयोध्येत काय करणार आहात ?
राज ठाकरे यांनी माफी मागावी, ही माझी वैयक्तिक भूमिका आहे. माझ्या पक्षाचा याच्याशी काही संबंध नाही. आम्ही रामाचे वंशज आहोत. माफी मागा नाही तर अयोध्येत कुठल्याही परिस्थितीत राज ठाकरेंना आम्ही घुसू देणार नाही. महिन्याभरापासून यासाठी मी प्रांतवार दौरे करत आहे. संपूर्ण उत्तर प्रदेश आम्ही ढवळून काढला आहे. ५ जूनला, आमचे ५ लाख लोक प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत जमणार आहेत. कुठल्याही परिस्थितीत माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत घुसू न देण्यासाठी आमचे कार्यकर्ते सज्ज आहेत. आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना अटकाव घालणार आहोत.

- राज ठाकरेंची भूमिका आता बऱ्यापैकी बदलली आहे. योगी आदित्यनाथ यांचेही त्यांनी कौतुक केले आहे?
हरकत नाही, मात्र ही माझ्या मते, त्यांची राजकीय यात्रा आहे, धार्मिक यात्रा नाही. धार्मिक यात्रा ढोल बडवून केल्या जात नसतात. हे सर्व राजकारण आहे. ठाकरेंना आपले अपयशी राजकारण हिंदुत्वाच्या नावाखाली नव्याने सुरू करायचे आहे. त्यासाठी हा ड्रामा सुरू आहे.

- अयोध्या धार्मिक आस्थेचे प्रतीक आहे, कुणाला दर्शनापासून अडवणे योग्य आहे का?
माझे भांडण राज ठाकरे यांच्याशी आहे. महाराष्ट्रासोबत, मराठी माणसासोबत माझे कोणतेही वैर नाही. मी तर त्या दिवशी अयोध्येत येणाऱ्या मराठी माणसाला हॉटेल, लॉजमध्ये ५० टक्के सवलत देण्याचे आवाहन करतो. त्यांना जर राहायला जागा मिळाली नाही तर आम्ही आमचे घर खाली करून देऊ, मात्र राज ठाकरे माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊलही ठेवू देणार नाही. ज्यांना काय समजायचे आहे, त्यांनी समजून जावे.

- भाजप हायकमांडने आंदोलन थांबवण्याचे आदेश दिल्यास, तुमची भूमिका काय असेल?
माझी भूमिका मांडल्यापासून आतापर्यंत मला भाजपच्या कुठल्याही नेत्याने संपर्क केला नाही, ना मी त्यांना संपर्क केला. मला हे करायला कुणी मनाई केली नाही. भाजप हायकमांडने मला सांगितले तरी माझी भूमिका काही बदलणार नाही. ज्यांना शंका असेल त्यांनी आजपर्यंतच्या माझ्या राजकीय प्रवासावर एक नजर टाकावी. माझ्या भूमिकेवर मी कायम ठाम राहिलो आहे.

- राज ठाकरेंनी माफी मागितल्याचा दावा साध्वी कांचन यांनी तुमच्याकडे केला होता?
कांचन साध्वीला मी ओळखत नाही. त्या दिवशी अचानक त्या प्रकटल्या होत्या. मी सांगितले, जशी आम्ही पत्रकार परिषद घेतली, तशीच राज ठाकरे यांनीही घ्यावी आणि जाहीर माफी मागावी. प्रकरण समाप्त होईल. आता साध्वी परत फिरकणार नाहीत, याची मला खात्री आहे.