
प्रदूषण करणाऱ्यांवर बडगा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १९ : तळोजा एमआयडीसीतून वाहणाऱ्या कासाडी नदीचे पाणी प्रदूषित करणाऱ्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने दणका दिला आहे. नदीत रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्या तीन सर्विस स्टेशन तत्काळ बंद करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रायगड विभागाच्या कार्यालयाने दिले आहे. आयआयटी मुंबईने घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यात नदी प्रदूषित झाल्याचा निष्कर्ष समोर आला होता. याबाबत ‘सकाळ’ने बातमी प्रसिद्ध करून प्रदुषणाची पोलखोल केली होती.
गेल्या काही दिवसांपासून तळोज्यातील कासाडी नदीतील प्रदूषणाच्या तक्रारी विविध सामाजिक संघटनांतर्फे समोर येत आहेत. काही संघटनांनी या प्रकरणी आवाज उठवल्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाने या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित केले आहे. तसेच नदीतील पाण्याची शुद्धता तपासण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या होत्या. याची दखल घेत मुंबई आयआयटीला नदीतील प्रदूषण रोखण्याबाबत नियोजन आराखडा तयार करण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या.
कासाडीतील प्रदूषण मोजण्यासाठी मुंबई आयआयटीच्या पथकांनी काही दिवसांपूर्वीच तीन वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याचे नमुने घेतले होते. या नमुन्यांची तपासणी केली असता, रासायनिक ऑक्सिजनची मागणी आणि जैविक ऑक्सिजनची मागणी जास्तीत जास्त परवानगी मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. तसेच रासायनिक घन पदार्थ विरघळल्याचे आढळून आले आहे.
तळोजा एमआयडीसीमधील उद्योगांमधून कासाडी नदीत विनाप्रक्रिया रासायनिक पाणी नदीत सोडले जात असल्याने पाण्याचे प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रायगड विभागाच्या अधिकाऱ्यांनी तळोज्यातील तीन सर्विस स्टेशन बंद करण्याच्या नोटिसा दिल्या. यात खिडुकपाड्याचा साई कृपा सर्विस स्टेशन व साई राज सर्विस स्टेशन आणि कळंबोलीतील स्टील मार्केटमध्ये असणाऱ्या किराट सर्विस स्टेशनला बंद करण्यात येणार असल्याची माहिती रायगडचे प्रादेशिक अधिकारी व्ही. व्ही. किल्लेदार यांनी दिली.
प्रदूषणाचा त्रास
कासाडीतील प्रदूषण फक्त एमआयडीसी क्षेत्रापुरताच मर्यादित राहत नाही, नदी पुढे तळोजा खाडीत वाहत जाते. तिथेही प्रदूषित पाण्यामुळे दुर्गंधी येत असल्याच्या अनेक तक्रारी खाडी व नदीकिनारी असणाऱ्या वसाहतींतील नागरिकांकडून नोंदवण्यात आल्या आहेत. तसेच तळोजा खाडीमार्गे प्रदूषित पाणी नदी आणि समुद्रात सोडले जात असल्याने खाऱ्या पाण्यातील जलचरांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
बेकायदा सर्व्हिस स्टेशनचे पेव
तळोजा मार्गावर मोठ्या प्रमाणात रासायनिक कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये ये-जा करणाऱ्या रसायनांच्या टँकरमधून मोठ्या प्रमाणात शिल्लक ऑईल व रसान टँकरचालकांमार्फत चोरला जातो. हे चोरीचे रसायन ड्रममध्ये भरून काळ्याबाजारात विकला जाते. दरम्यान टँकर धुण्यासाठी बेकायदा चालणाऱ्या सर्विस स्टेशनचे तळोजा मार्गावर पेव फुटले आहेत. हे सर्विस स्टेशन कोणत्याही नियमांचे पालन न करता थेट रसायनांचे टँकर धुतात. या वेळी रसायनमिश्रित पाणी नदीत, नाल्यांत सोडले जाते. त्यामुळे या भागात उग्र वास येत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून करण्यात येत आहेत.